खडकवासला धरणात बुडून युवक-युवतीचा मृत्यू; सोनापूर येथील घटना | पुढारी

खडकवासला धरणात बुडून युवक-युवतीचा मृत्यू; सोनापूर येथील घटना

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणात पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत युवक आणि युवतीचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार २१ डिसेंबरला सकाळी उघडकीस आला. रात्री सायंकाळी उशिरापर्यंत दोघांची नावे समजू शकली नाहीत. या प्रकरणी हवेली पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. मयत युवक व युवतीचे वय अंदाजे २० वर्षे इतके आहे. दोघांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याबाबत हवेलीचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, की दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

पानशेत रस्त्यावर सकाळपासून वाहनांची वर्दळ असते. सकाळी पुणे-पानशेत रस्त्यावर सोनापूर येथील खाद्यपदार्थ विक्रीच्या टपरीजवळ रस्त्याच्या कडेला एक दुचाकी बेवारसपणे उभी होती. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेता आजूबाजूला कोणी आहे का, हे पाहण्यासाठी गेला. त्या वेळी त्याला खडकवासला धरणाच्या पाणलोटात एक बॅग पाण्यावर तरंगताना दिसली.

त्यामुळे त्याने पाण्यात आसपास पाहिले असता, दोन मृतदेह तरंगत असल्याचे त्या विक्रेत्याला दिसले. त्याने तातडीने ही माहिती हवेली ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, पोलिस जवान प्रवीण ताकवणे यांना कळवताच ते घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक अनिल कांबळे व ग्रामस्थांच्या मदतीने युवक व युवती या दोघांचेही मृतदेह काढण्यात आले.

मृतदेह अद्यापही बेवारस
धरण तीरावर बेवारस अवस्थेत असलेल्या दुचाकीच्या नंबरवरून हवेली पोलिसांनी सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे तपास केला. मात्र, सदर व्यक्ती सध्या तेथे राहत नसल्याची माहिती मिळाली.

Back to top button