पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; दिंडोरी रोडवरील पुणे विद्यार्थी गृह संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय आणि बांधकाम व्यावसायिक रतन अवस्ती यांनी विना परवानगी ५ झाडे तोडल्या प्रकरणी महापालिकेच्या पंचवटी उद्यान विभागाकडून दोघांवर तीन लाख रुपयांचा दंड ठोठावत दंडात्मक कारवाई केली आहे.
संबधित बातम्या :
पंचवटीतील आडगाव शिवारातील जत्रा नांदूर लिंक रोड येथील खाजगी प्लॉटमधील बोर, बाभूळ आणि सुबाभूळ असे एकूण ३ झाडे बांधकामास अडथळा ठरत असल्याने बांधकाम व्यावसायिक रतन अवस्ती यांनी ऑगस्ट महिन्यात महापालिकेची पूर्व परवानगी न घेता तोडल्याचे समोर आले आहे. या अवैध वृक्षतोडीबद्दल अवस्ती यांना १ लाख १० हजार रुपये दंड ठोठविण्यात आला आहे.
दुसरी घटना दिंडोरी रोडवरील पुणे विद्यार्थी गृह संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारातील १ वडाचे आणि १ रेनट्री जातीचे असे दोन झाडे १५ सप्टेंबर रोजी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैध पद्धतीने तोडल्याचे समोर आले होते. या अवैध वृक्षतोडी प्रकरणी सदर संस्थेस १ लाख ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदरची करण्यात आलेली दंडात्मक कारवाईतील दंडाची रक्कम ४ दिवसांच्या मुदतीत भरायची असून महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ चे कलम २१(१) नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महापालिकेचे पंचवटी विभागीय अधिकारी व उद्यान निरीक्षक यांनी दिली आहे.
नाशिक शहरातील अवैध वृक्षतोडीवर महापालिकेच्या उद्यान विभागाचे बारीक लक्ष आहे. आपल्या परिसरात अश्या प्रकारे जर अवैध वृक्षतोडी होत असेल तर महापालिकेच्या उद्यान विभागास माहिती कळवावी. त्यावर नक्कीच योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :