चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या प्रश्नाला घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली.त्यावर चर्चा झाली.मात्र जेव्हा ओबीसींच्या प्रश्न येतो तेव्हा मुख्यमंत्री भाजपच्या लोकांना घेऊन बैठक लावतात. ओबीसीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार गंभीर आहे काय ? असा थेट सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.चंद्रपुरात ओबीसी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळाला वडेट्टीवार यांनी काल बुधवारी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर घणाघात केला.
चंद्रपूरात रविंद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून आंदेालन सुरू केले आहे. त्यानंतर तयांची प्रकृती खालावल्याने ते जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या ऐवजी विजय बल्की हे उपोषणाला बसले आहेत. अद्याप ओबिसींच्या आंदोलनाची सरकारने अद्यापही दखल घेतली नाही त्यामुळे वडेट्टीवार आक्रमक झाले. सरकारवर ताशेरे ओढताना वडेट्टीवार म्हणाले,जी बैठक घेतली ती गोंधळलेल्या सरकारचा नवा गोंधळ आहे. ओबीसी समाज असो की, कुठलाही समाज असो त्यांचे प्रश्न सोडवताना सर्वांना सोबत घेऊन सोडवायला पाहिजे. या सरकारचा काहीतरी वेगळा डाव आहे. ओबीसींना फसवण्याची या सरकारने नवीन योजना आखली आहे. या बैठकीवर इतरांनी बहिष्कार टाकायला पाहिजे. जोपर्यंत सर्वपक्षीय बैठक होत नाही तोपर्यंत कुणीही त्या बैठकीला जाऊ नये असे आवाहन केले. पुढे त्यांनी, जे कधीच ओबीसीसाठी लढले नाही. ते सरकारच्या इशारावर बोलतात. ओबीसींसाठी जे रात्र दिवस लढतात त्यांना तुम्ही का बोलावलं नाही संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.