Latest

नाशिक महापालिकेत 80 जागा नक्कीच जिंकू : गिरीश महाजन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नाशिक प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रथमच शनिवारी (दि. 5) नाशिकमध्ये आगमन झाले. त्यामुळे त्यांचे आमदारांपासून ते कार्यकर्ते या सर्वांनीच जंगी स्वागत केले. अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी प्रत्येकाला ओळखतो त्यामुळे कामगिरीनुसारच उमेदवारी देणार, असे उत्तर महाजन यांनी दिले. पक्षाचे उद्दिष्ट शंभर प्लस आहे. मात्र 80 जागा नक्कीच जिंकू, असा आत्मविश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

महाजन यांनी भाजपच्या 'वसंतस्मृती' कार्यालयात सूत्रे स्वीकारली. यावेळी झालेल्या सोहळ्यात त्यांनी नवाब मलिक, एकनाथ खडसे, संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे, विजय साने, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप यांची स्वागतपर भाषणे झाली. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी महाजन यांच्या आगमनामुळे आपला विजय निश्चित असल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. पाच वर्षांत नाशिक शहरामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्यामुळे नाशिककरांमध्ये भाजपविषयी समाधानाचे वातावरण असल्याचे गिरीश महाजन यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

गेल्या अडीच वर्षांत राज्यातील ठाकरे सरकार महापालिकेच्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम करीत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला. केंद्र शासनाच्या मदतीने मोठमोठे प्रकल्प नाशिकमध्ये राबविले जात असल्यामुळे नाशिककर भाजपला निश्चितच पुन्हा संधी देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊत, पालकमंत्री छगन भुजबळ हे एकत्र आले, तरी नाशिकच्या जनतेच्या मनात मात्र कमळ आहे. सत्ताधारी पक्षाचा गृहमंत्री जेलमध्ये जाण्यासारखा दुर्दैवी प्रकार घडला आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाल्याची टीकाही महाजन यांनी केली.

कार्यक्रमास महापौर सतीश कुलकर्णी, महेश हिरे, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, रोहिणी नायडू, हिमगौरी आडके आहेर आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका : निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात असले, तरी त्याबाबत गाफील राहू नका, असे आवाहन महाजन यांनी कार्यकर्त्यांना केले. मे महिन्याच्या आत निवडणुका होतील, असे सांगत आतपासूनच प्रचाराला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

महाजनांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव
स्वागतपर कार्यक्रमांमध्ये महाजन यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा आणि त्यानंतर काही आमदार तसेच पदाधिकार्‍यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. आज त्याच महाजनांवर संबंधितांनी स्तुतिसुमने उधळली. भाजप नेते विजय साने यांनी कामगिरी आणि गुणवत्ता पाहूनच उमेदवारी द्यावी, अशी सूचना करीत एकाच घरात दोन-दोन तिकिटे न देण्याची मागणी केली. लक्ष्मण सावजी यांनी, गिरीशभाऊ आमच्यावर असा वरदहस्त कायम ठेवा, असे सांगताच महाजन यांनी निवडणुकीनंतर काय, असा प्रश्न केला. त्यावर निवडणुकीनंतरही वरदहस्त राहू द्या, असा मिश्कील टोमणा हाणला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT