नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुप्रतीक्षित नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली असून, दि. ३० जानेवारीला मतदान तसेच २ फेब्रुवारीला मतमोजणी होेईल. मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असले, तरी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे आणि भाजपचे संभाव्य उमेदवार राजेंद्र विखे – पाटील यांच्यातच तुल्यबळ लढतीची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. २९) राज्यातील नाशिक व अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या पाचही मतदारसंघांत अंतिम मतदार याद्या शुक्रवारी (दि. ३०) प्रसिद्ध होणार असताना, त्या पूर्वसंध्येला थेट निवडणुका घोषित झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आयोगाच्या कार्यक्रमानुसार 5 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना घोषित करायची आहे. त्यावेळेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जांची अंतिम मुदत १२ तारखेपर्यंत असेल, तर १३ जानेवारीला अर्जांची छाननी तसेच १६ ला माघारीची मुदत असेल. तसेच ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत मतदान होणार असून, २ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे.
नाशिक पदवीधरसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांमधील इच्छुकांनी मागील सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत मविआ एकत्रित उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे तथा विद्यमान आ. तांबे यांना उमेदवारी मिळू शकते. तांबे यांनी सलग तीन टर्म मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून हा मतदारसंघ पुन्हा मिळविण्यासाठी भाजप उत्सुक आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे – पाटील यांचे नाव भाजपकडून आघाडीवर असून, डॉ. प्रशांत पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. याशिवाय नाशिकमधून के. व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, धुळ्यातून विसपुते हेही इच्छुक आहेत.
निवडणूक कार्यक्रम
५ जानेवारी : निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी
१२ जानेवारी : अर्ज दाखल करायची अंतिम मुदत
१३ जानेवारी : दाखल अर्जांची छाननी
१६ जानेवारी : माघारीसाठीची मुदत
३० जानेवारी : मतदान सकाळी ८ ते दुपारी ४
२ फेब्रुवारी : मतमोजणी