

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आरसी बुक आणि पक्क्या परवान्यासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्डचा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून आरटीओ कार्यालयात तुटवडा आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 4 हजार नागरिकांना अद्यापपर्यंत आरसी बुक आणि पक्का परवाना मिळालेला नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयाला रोझ मार्टा प्रा. लि. कडून आरसी बुक आणि युटीएल लि. (युनायटेड टेलिकॉम लिमिटेड) यांच्याकडून पक्क्या परवान्यासाठी स्मार्ट कार्डचा पुरवठा करण्यात येतो.
मात्र, गेली 15 ते 20 दिवसांपासून पुणे आरटीओ कार्यालयाला आरसी बुक आणि पक्क्या परवान्यासाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरटीओमध्ये हेलपाटे वाढले असून, नागरिकांना वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर दाखविण्यासाठी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. यामुळे अनेकदा वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वादावादी होत आहे.
हेलपाट्यांमुळे वैताग
पोस्टाने पुन्हा आपले आरसी बुक आणि पक्का परवाना परत गेला आहे की नाही, ही माहिती घेण्यासाठी आरटीओतील वितरण विभागात गुरुवारी रांगा लागल्या होत्या. मात्र, या ठिकाणी आल्यावर अनेकांना समजले की त्यांचे आरसी बुक, पक्का परवाना प्रिंट झालेला नाही. त्यामुळे नाराज होत अनेक वाहनचालक पुन्हा घरी परतले.
कर्मचार्यांना तीन महिने पगार नाही…
आरटीओ कार्यालयातील एका विभागात रोझ मार्टा कंपनीकडून स्मार्ट कार्डवर आरसी बुक आणि युटीएल कंपनीकडून पक्का परवाना प्रिंट करून दिला जात आहे. या कामासाठी कंपनीकडून काही कर्मचार्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. मात्र, या कर्मचार्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार दिला गेलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.