कोल्हापूर विमानतळावर पहिले नाईट लँडिंग | पुढारी

कोल्हापूर विमानतळावर पहिले नाईट लँडिंग

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नाईट लँडिंगची सुविधा झाल्यापासून कोल्हापूर विमानतळावरून आजअखेर आठ विमानांचे रात्री उड्डाण झाले. मात्र, गुरुवारी (दि. 29) विमानाचे पहिले नाईट लँडिंग झाले. सायंकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी पुण्याहून आलेले विमान कोल्हापूरच्या धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरले.

आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह तीन प्रवासी या विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. या तीन प्रवाशांना सोडून विमानाने रात्री पावणेनऊ वाजता पुन्हा टेक ऑफ घेतले. नाईट लँडिंगसाठीही कोल्हापूर विमानतळ सुरक्षित असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

कोल्हापूर विमानतळावर 3 नोव्हेंबरपासून नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली आहे. 13 नोव्हेंबर रोजी राज्याचे मंत्री उदय सामंत कुटुंबीयासह तिरुपतीला विमानाने गेले. यानंतर आतापर्यंत आठ वेळा कोल्हापूर विमानतळावरून रात्रीचे उड्डाण झाले. दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला गेले. नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यापासून रात्रीचे टेक ऑफ झाले होते. मात्र, लँडिंग झाले नव्हते, आज प्रथमच नाईट लँडिंग झाले.

कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेसाठी पालकमंत्री म्हणून केलेल्या प्रयत्नांना यश आले. नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली. आज त्याचा प्रत्यक्ष आणि पहिला अनुभव घेताना आनंद होत आहे. विमानतळाच्या विस्तारासाठी आणि पर्यायाने कोल्हापूरच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न सुरूच राहील.

– आमदार सतेज पाटील

Back to top button