भोर : मांढरदेवी यात्रेसाठी प्रशासनाने सतर्क राहावे; प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची सूचना | पुढारी

भोर : मांढरदेवी यात्रेसाठी प्रशासनाने सतर्क राहावे; प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची सूचना

भोर; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी महिन्यात होणार्‍या मांढरदेवी येथील काळूबाई देवीच्या यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहावे, अशी सूचना भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. पुणे-सातारा महामार्गावरील कांजळे (ता. भोर) व दि. 5 ते 7
जानेवारीदरम्यान होणार्‍या मांढरदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भोर तालुका प्रशासनाची आढावा बैठक तहसील कायार्लयात पार पडली, त्या वेळी कचरे बोलत होते.

या वेळी तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सचिन पाटील, उपअभियंता संजय वागज, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत का-हाळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, डॉ. पौर्णिमा येवतीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ, आंबाडे सरपंच हेमलता खोपडे आदी उपस्थित होते.

संबंधित सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून आपापली कामे चोख पार पाडावीत. दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोविड नियमांचे पालन करावे लागेल, अशा सूचना कचरे यांनी दिल्या. भोर – मांढरदेवी रस्त्यावरील झाडेझुडप काढून साईडपट्ट्यांत खड्डे भरले आहेत. रस्त्याची रंगरंगोटी करून रिफ्लेक्टर बसवले आहेत. पुढील दोन दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे उपअभियंता वागज यांनी सांगितले.

पंचायत समिती आरोग्य विभागाकडून 8 वैद्यकीय अधिकारी, 10 समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक – सेविका आदी 61 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भोर- मांढरदेव मार्गावर पाच ग्रामपंचायती असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी व हातपंपाचे पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत. 3 रुग्णवाहिकांसह 24 तास वैद्यकीय पथक राहणार आहे. वाहतुकीचा खोळंबा झालच तर दुचाकीवरील वैद्यकीय पथके तयार केली आहेत. आपत्कालीन पथक तयार ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी सांगितले.

एस.टी. महामंडाळाने चांगल्या सुस्थितीत असणार्‍या जादा गाड्या सोडाव्यात. गाड्या ब्रेकडाऊन झाल्यास त्याचे योग्य नियोजन करावे. दारू, कोंबडी, बकरी मांढरदेवला जाणार नाहीत व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा, अशी सूचना तहसीलदार सचिन पाटील यांनी केली. प्रत्येक विभागाने मांढरदेवी यात्रेनिमित्ताने केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती आढावा बैठकीत दिली.

मुख्यमंत्री शिंदे दर्शनासाठी येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळूबाईच्या दर्शनाला येणार आहेत. ते हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Back to top button