Latest

Nashik : म्हणून नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिराला कळस नाही, जाणून घ्या इतिहास

गणेश सोनवणे

नाशिक : गौरव जोशी 

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते । आसामची कामाख्या देवी, बंगालची कालीमाता, पंजाबची ज्वालामुखी, काशीची मनकर्णिका, कोल्हापूरची अंबाबाई या देवींच्या 51 पीठांएवढेच महत्त्व नाशिकच्या भद्रकाली देवीचे आहे. नाशिकची मूळ ग्रामदेवता असलेल्या भद्रकाली देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला कळस नाही. त्यामुळे कळस नसलेले बहुधा हे देशातील एकमेव मंदिर असावे.

भद्रकाली देवी मंदिर हे अत्यंत प्राचीन असून, सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक काळापूर्वी त्याची स्थापना झाली. मूळ मंदिर हे अतिप्राचीन आहे. 1790 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद तत्कालीन कागदपत्रांत आढळते. मंदिराच्या इतिहासाबाबत असे सांगितले जाते की, जुन्या नाशिकमधील पाटील लेनमध्ये देवी भद्रकालीचे मंदिर होते. मात्र, मोगलांनी केलेल्या आक्रमणावेळी या मंदिराची नासधूस केली. त्यामुळे तत्कालीन भाविकांनी देवीची मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते. मंदिरावर पुन्हा परकीय आक्रमण होऊ नये म्हणून बाहेरून ते मठ किंवा वाडा दिसेल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली. त्यामुळेच या मंदिरावर कळस आढळून येत नाही. मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी विधिवत तेथे देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी मंदिराला भेट दिली आहे. भद्रकाली देवी मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे शक्ती आणि ऊर्जेचे केंद्र राहिले आहे. मंदिराच्या पूजेची जबाबदारी कावळे घराण्याकडे असून, त्यांची सहावी पिढी मंदार कावळे हे सध्या जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. दरम्यान, यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवात मंदिर देवस्थान समितीतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराविषयीची आख्यायिका :

देवीच्या 51 शक्तिपीठ निर्मितीविषयी तंत्राचुडामणी ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. शिवपुराणामध्ये साक्षात भगवतीचे 51 वर्णन करण्यात आले आहेत. देवी पार्वतीचे पिता दक्ष प्रजापतींनी आरंभिलेल्या यज्ञामध्ये सर्व देवता, गंधर्व, ऋषिगणांना आमंत्रित करण्यात आले. परंतु यज्ञामध्ये साक्षात देवाधिदेव महादेवांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे आपल्या पित्याच्याच घरी यज्ञ असूनही पार्वती यज्ञास गेली. महादेवांनी अनेकदा सांगूनदेखील पार्वतीने यज्ञास जाण्याचा मार्ग निवडला. अशा यज्ञामध्ये महादेवांचा अपमान अवहेलना सहन न झाल्याने देवी पार्वतीने तत्काळ यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. हे ज्यावेळेस महादेवांना समजले त्यावेळेस महादेवांनी दक्ष प्रजापतीचे शिरच्छेदन केले. तसेच त्या पूर्ण यज्ञाचा विध्वंस करताना सखी पार्वतीचे शव घेऊन तिन्ही लोकांमध्ये शोक करू लागले. महादेवांच्या या शोकाला आवर घालणे कुणासही शक्य नव्हते. तेव्हा सर्व देवांनी विष्णूंची स्तुती करून विष्णूंना यावरती उपाय शोधण्याची विनंती केली. यावर भगवान श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या सहाय्याने सती पार्वतीच्या शवाचे छेद केले. पार्वतीच्या शरीराचे जे-जे अवयव अथवा शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे एक शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या सुरक्षेसाठी महादेवांनी भैरवाची स्थापना केली. या 51 शक्तिपीठांपैकी हनुवटीचा म्हणजेच चिबुक स्थानाचा भाग हा 'जनस्थान' म्हणजेच नाशिक येथील भद्रकाली देवी होय. या देवीचा भैरव हा साक्षात विकृताक्ष आहे. या देवीची भ—ामरी ही शक्ती आहे.

समाजकार्यातही अग्रेसर
भद्रकाली देवीमंदिर हे केवळ शक्तिपीठच नव्हे, तर एक विशिष्ट धार्मिक अधिष्ठान आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला जोडणारे हे अधिष्ठान आहे. मंदिर समितीतर्फे धार्मिक कार्यासह समाजकार्यही करण्यात येते. देवस्थानातर्फे अल्पदरात बालशिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्थेच्या मदतीने बाल विद्यालय चालवण्यात येते. नाशिक प्राच्यविद्यापीठामार्फत संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना दरवर्षी गुणगौरव आणि शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच संपूर्ण वर्षभर मंदिरामध्ये बालसंस्कार केंद्र चालविण्यात येते. तसेच कोविड काळात शहरातील तीन हजारांहून अधिक पुरोहित, नाभिक, समाजकार्य करणार्‍या महिला, फूलविक्रेते अशा घटकांना दोन महिने पुरेल इतके धान्यवाटप करण्यात आले. तसेच कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक ती मदत करण्यात आली. समाजात घडणार्‍या कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पालकत्व स्वीकारून त्या घटकांच्या पाठीशी उभे राहणे, हे मंदिर देवस्थान आद्यकर्तव्य म्हणून स्वीकारते.

मंदिरात प्राचीन मूर्ती
भद्रकाली देवीच्या गाभार्‍यात 9 ते 10 इंच उंचीच्या नऊ प्राचीन मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूंच्या असून, या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपतीदेखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून, आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. वासंतिक, शारदीय असे दोन नवरात्रोत्सव भद्रकाली देवीमंदिरामध्ये साजरे करण्यात येतात. अत्यंत पारंपरिक पद्धतीने सर्व वार्षिक उत्सव येथे साजरे होतात. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तिमार्गाने देवीची सेवा करण्यात येते. त्यात प्रातः महाअभिषेक पूजन, सप्तशती पाठ, महानैवेद्य, देवी भागवत पुराण, शुक्ल यजुर्वेद संहिता, पारायण अशा प्रकारे वेगवेगळ्या आध्यात्मिक तसेच संगीत सेवा, भजन सेवा, कीर्तन सेवा, सामूहिक स्तोेत्र पठण, संस्कारवर्ग अशा पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे केले जातात. मंदिरामध्ये उत्सवामध्ये रोज कुमारिका पूजन, ब—ाह्मण भोजन, कुंकुमार्चन आदी विशेष पूजनदेखील करण्यात येते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT