चंद्रपूर : नवरात्रोत्सव काळात जन्मलेल्या कन्यांना भेट स्वरूपात देणार चांदीचे नाणे | पुढारी

चंद्रपूर : नवरात्रोत्सव काळात जन्मलेल्या कन्यांना भेट स्वरूपात देणार चांदीचे नाणे

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : एक ऑक्टोंबर पासून चंद्रपुरात आयोजित महाकाली महोत्सवानिमित्त बेटी बचाओचा संदेश देण्यासाठी एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. नवरात्रो उत्सवादरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचे नाणे देण्याचा निर्णय महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर सिक्के माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी देण्याची घोषणा केली आहे.

चंद्रपूरची अराध्य दैवत माता महाकाली व येथील मंदिराची प्रचिती राज्यभरात पोहचविण्यासाठी महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून व माता महाकाली सेवा समिती यांच्या वतीने १ ऑक्टोंबर हे आयोजन करण्यात आले आहे.

माता महाकाली मंदिर पंटागणात चार दिवसीय भव्य श्री माता महाकाली महोत्सव करण्यात येणार आहे. सदर महोत्सावत प्रसिध्द जागरणकार, गायिका, भजन मंडळे, कथा वाचक सहभागी होणार आहे. सदर महोत्सवा दरम्यान बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रोत्सव दरम्यान चंद्रपुरात जन्मास येणा-या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचे नाणे देण्याचा निर्णय माता महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर सदर नाणे देण्याची जबाबदारी माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी स्विकारली आहे. सदर नाणी महाकाली महोत्सवा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी २६ ऑक्टोंबर ते ४ ऑक्टोंबर या नवरात्रो उत्सवादरम्यान चंद्रपुरात जन्मलेल्या कन्यांच्या पालकांनी महाकाली मंदिराच्या कार्यालयात किंवा महाकाली महोत्सव सेवा समितीच्या मंडपात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

Back to top button