Latest

नाशिक : पंचवटीतील रामसृष्टीत साकारणार ६१ फुटी श्रीरामचंद्रांचे शिल्प

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील तपोवनात असलेल्या रामसृष्टीत तब्बल ६१ फुटी प्रभू श्रीरामचंद्रांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. तपोभूमी, सिंहस्थ भूमी तसेच देशभरामधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदाकाठावरील पंचवटीला त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. रामसृष्टी हे भविष्यात भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पर्यटन विभागाकडून ५ कोटींचा विशेष निधी मिळविला आहे.

जुने नाशिक अर्थातच गावठाणातील पंचवटीला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी वास्तव्य केले आहे. पंचवटीतील काळाराम मंदिराला जागतिक पातळीवर महत्त्व आहे. या ठिकाणी सीतागुंफासारखे महत्त्वाचे ठिकाण आहे. हेच महत्त्व अधोरेखित करत आ. ढिकले यांनी याठिकाणी येणाऱ्या भाविकांना 'भव्य दिव्य' अशा शिल्पाद्वारे दर्शन करता यावे, या दृष्टीने तब्बल ६१ फूट शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ११ ऑक्टोबर २०२२ रोजी पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना शिल्पाची संकल्पना सांगितली असता त्यांनी तत्काळ प्रस्तावाला गती दिली. आ. ढिकले यांच्या पाठपुराव्यानंतर पर्यटन विभागाने त्यांना पत्र पाठवत रामसृष्टीत प्रभू श्रीरामचंद्रांचे शिल्प तसेच संगीत कारंजा व विद्युत रोषणाई कामास मंजुरी दिल्याचे कळविले आहे.

१५० कोटींची विविध विकासकामे

राज्यात भाजपची सत्ता येताच अवघ्या आठ महिन्यांत मतदारसंघात आ. ढिकले यांनी मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व अंदाजपत्रकात पेठ रोड येथे ९९ कोटींचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती संकुल तसेच नांदूर नाका येथे ५० कोटी रुपयांचा उड्डाणपूल, सारथीसाठी जवळपास ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मालेगाव स्टॅण्ड येथे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ३०० बेडचे रुग्णालय मंजुरीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाला आहे. मिरची चौकात उड्डाणपूल मंजुरीसाठी पाठपुरावा केला जात असल्याचे आ. ढिकले यांनी सांगितले.

तपोवनात गेल्यानंतर भाविकांना प्रभू रामचंद्रांचे स्मरण व्हावे, या दृष्टीने भव्य शिल्प उभारण्याची मनीषा होती. पाच कोटींचा निधी मंजूर झाल्यामुळे प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

-ॲड. राहुल ढिकले, आमदार

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT