शिवनेरी ते वढू बुद्रुक मार्गासाठी मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक | पुढारी

शिवनेरी ते वढू बुद्रुक मार्गासाठी मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थळ वढू बुद्रुक हा संपूर्ण राज्यभरातील शिवभक्त व शंभूभक्तांसाठीचा स्वतंत्र मार्ग बनविण्यासाठी आपण लवकरच त्यावर निर्णय घेऊ, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाला दिली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 9) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी वढू बुद्रुकला 21 मार्च रोजी येण्याबाबत लवकरच कळविण्याचीही ग्वाही दिली.

स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज समाधिस्थळासाठी 397 कोटींचा विकास आराखडा मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी वढू बुद्रुकचे उपसरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अंकुश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे यांनी आढळराव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या वेळी वढू ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी (ता. जुन्नर) ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थळ वढू बुद्रुक (ता. शिरूर) हा स्वतंत्र मार्ग विकसित करण्याची तसेच या संपूर्ण मार्गासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी केली. यावर श्री. शिंदे यांनी याबाबत आपण लवकरच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू आणि ठोस निर्णय जाहीर करू, असे सांगितले.

दरम्यान, दि. 21 मार्च रोजी धर्मवीर संभाजी महाराजांची 334 वी पुण्यतिथी आहे. त्यादिवशी येथे शासकीय मानवंदनाही दिली जाते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचेही निमंत्रण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून,
त्यातून कसा वेळ काढता येईल ते पाहून कळवतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे अंकुश शिवले यांनी सांगितले.

या मार्गाची अपेक्षा
शिवजन्मभूमी शिवनेरी-जुन्नर-नारायणगाव (तीनही ता. जुन्नर) पारगाव-धामणी-लोणी (तीनही ता. आंबेगाव) व पाबळ-केंदूर-चौफुला-वढू बुद्रुक (ता. शिरूर) असा हा एक सलग सहापदरी रस्ता शंभूभक्त-शिवभक्तांना अपेक्षित आहे. याबाबत तत्काळ सर्व्हेक्षण करू, अशीही ग्वाही या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती माजी सरपंच अंकुश शिवले यांनी दिली.

Back to top button