नगर : शिवजयंती ! डीजेचा दणदणाट... मर्दानी खेळ शिवप्रेमींचे आकर्षण | पुढारी

नगर : शिवजयंती ! डीजेचा दणदणाट... मर्दानी खेळ शिवप्रेमींचे आकर्षण

नगर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती शिवसेना (शिंदे गट), शिवसेना(ठाकरे गट) भाजपच्या पदाधिकार्‍यांनी डीजेच्या दणदणाटात उत्साहात साजरी केली. सायंकाळी मिरवणुकीला सुरूवात झाली, रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. त्यात छत्रपतींच्या वेशभूषेत मावळे, बजरंगबली हनुमाची मूर्ती, हलगी पथक, मर्दानी खेळ शिवप्रेमींचे आकर्षण ठरले. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवजयंती मिरवणुकीला सुरूवात झाली. सात मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यात शिवसेना, शिवसेना (ठाकरे गट), तुळजाभवानी युवा मंच झरेकर गल्ली, नालेगाव ग्रामस्थ, हिंदू राष्ट्र सेना, वर्चस्व ग्रुप, समस्त हिंदू समाज माळीवाडा यांचा सहभाग होता.

शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. डीजेच्या दणदणाटाने परिसर हदरून गेला होता. माळीवाडा परिसरात मिरवणूक आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी तरुण सहभागी झाले होते. मनापानावरून नाराज झालेले दोन्ही सेनेचे पदाधिकारी मिरवणुकीत गुण्यागोविंदाने एकत्र दिसले.

तरुणांच्या जय भवानी… जय शिवाजी जय घोषणाने परिसर दणाणून गेला होता. ही मिरवणूक पाहण्यासाठी नगर शहरासह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या मिरवणुकीत वानर सेनेसह आलेले बजरंगबली, मर्दानी खेळ, मावळ्यांसह शिवाजी महाराज, पारंपरिक वाद्ये आकर्षणाचा केंद्र ठरले. पारंपरिक मार्गाने मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नगर शहर शिवमय
शहरात सर्वत्र शिवमय वातावरण झाले होते. शिवसेना भाजपच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्येक भागामध्ये चौका-चौकात शिवजयंती साजरी केली. दिवसभर पोवाडे, प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू होते.

शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले
ढोल-तशा, हलगी, मर्दानी खेळ पाहण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. मर्दानी खेळाने डोळ्याचे पारणे फेडले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व लाईटची व्यवस्था करूनही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यासाठी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

Back to top button