अमरावती, पुढारी वृत्तसेवा : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खुद्द जगदंबा माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकटली,अशी आख्यायिका आहे. हीच जगदंबा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात असणारी मुर्हादेवी होय. विशेष म्हणजे, देशात हरिजनांसाठी मंदिर खुली करावी यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील सर्वात प्रथम हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुर्हा देवीचेच आहे.
अशी आहे आख्यायिका
मुर्हादेवीची मूर्ती ही सुमारे आठशे वर्षांपूर्वीची असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. या देवीबाबत दोन आख्यायिका सांगितल्या जातात. यापैकी एका आख्यायिकेनुसार, सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात वसलेल्या आदिवासी बांधवांची माहूरच्या देवीवर गाढ श्रद्धा होती. मात्र, मेळघाटातून माहूरला जाणे अतिशय कठीण होते. आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी खुद्द जगदंबा माता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी प्रकटली. या जगदंबा मातेला मेळघाटातील आदिवासी बांधव मुर्हाई देवी म्हणून मानतात. नवरात्रोत्सवात मेळघाटातून अनेक आदिवासी बांधव प्रचंड संख्येने मुर्हाई देवीच्या दर्शनासाठी परंपरेनुसार आज देखील येतात.
मुर्हादेवी : मुर्हा दैत्याचा संहार
या देवी संदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. अंजनगाव सुर्जी आणि लगतच्या परिसरात मुर्हा नावाच्या दैत्याची दहशत होती. या दैत्याचा विनाश करण्यासाठी जगदंबा माता प्रकटली आणि तिने या मुर्हा नावाच्या दैत्याला साखळदंडाने बांधून परिसरातील एका विहिरीत कैद केले. आज देखील चैत्र पौर्णिमेच्या रात्री या विहिरीतून आवाज येतो असे सांगितले जाते. विशेष म्हणजे, ती विहीर अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. त्यावर महादेवाची पिंड आणि नंदीची स्थापना करण्यात आली आहे. विहिरीवर महादेवाची पिंड आणि नंदी असणारे हे एकमेव ठिकाण असल्याचे मुर्हा देवी संस्थानचे पदाधिकारी सांगतात.
मुर्हादेवी : असा आहे इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी कारंज्याची लूट करून आणलेली संपत्ती अचलपूरच्या दिशेने जाताना मुर्हादेवीचे दर्शन घेतले होते. यानंतर त्यांनी आपल्या सोबत लुटून आणलेल्या खजिना मंदिर परिसरात असणार्या विहिरीत लपविला होता. आज देखील ज्या विहिरीत मुर्हा नावाचा दैत्य कैद आहे. त्या विहिरीत खजिना असल्याचे बोलले जाते. यामुळेच या विहिरीला खजिन्याची विहीर देखील म्हणतात.
महात्मा गांधींनी मानले आभार
हरिजनांसाठी देशातील सर्व मंदिरे खुली करण्यासंदर्भात महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान त्यांनी मुर्हादेवी मंदिर संस्थानला हरिजनांना प्रवेश देण्यासंदर्भात पत्र दिले होते. महात्मा गांधींच्या पत्राला प्रतिसाद देत त्याकाळी असलेल्या मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हरिजनांसाठी हे मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील पहिले सार्वजनिक न्यास म्हणून मुर्हादेवी मंदिर हे हरिजनांसाठी खुले झाले. स्वतः महात्मा गांधींनी मुर्हादेवी येण्याची तयारी दर्शवली होती. ते अंजनगाव सुर्जीपर्यंत पोहोचले देखील होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना अंजनगाव सुर्जी येथून परतावे लागले. त्यावेळी महात्मा गांधी यांनी 29 डिसेंबर 1933 रोजी अंजनगाव सुर्जी येथून मुर्हा देवी मंदिर संस्थानला पत्र लिहिले. या पत्रात मी मंदिरात येऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त करीत हरिजनांना मंदिरात प्रवेश दिल्याने मंदिराच्या विश्वस्तांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो असा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र आज देखील मंदिराच्या विश्वस्तांकडे असून, या पत्राची भव्य प्रत मंदिर परिसरात लावण्यात देखील आली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईशी साधर्म्य
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीच्या डोक्यावर बेलपत्र आणि शंकराची पिंड आहे आणि गळ्यात मोत्याची जशी माळ आहे. अगदी तसेच बेलपत्र आणि महादेवाची पिंड मुर्हादेवीच्या डोक्यावर आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणेच मोत्याची माळदेखील मुर्हादेवीच्या गळ्यात आहे. मूर्तीला वजरले चढवताना हे साधर्म्य पूरातत्व विभागाच्या अधिकार्यांच्या लक्षात आले आहे.
मुर्हादेवी : पूजेचा अधिकार केवळ महिलांनाच
मुर्हादेवीच्या पूजेचा अधिकार जुन्या परंपरेनुसार केवळ महिलांनाच आहे. देवीच्या स्नानावेळी लहान मुलांना देखील गाभार्यात प्रवेश दिला जात नाही. देवीच्या आंघोळीसह संपूर्ण पूजा विधी हा महिलांकडूनच केला जातो. विशेष पूरातत्व विभागाच्या देखरेखीखाली पाच वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला. तो वज्रलेप अमरावती शहरातील नीलिमा वानखडे यांनी लावला. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांच्या वतीने देवीमूर्ती समोर लावलेल्या पडद्याच्या मागून दिलेल्या सूचनेप्रमाणे नीलिमा वानखडे यांनी मूर्तीला वज्रलेप लावला. वज्रलेप लावताना मूर्ती निर्जीव करावी लागते. म्हणून ह्या मूर्तीतला जीव विधीद्वारे एका कलशात ठेवण्यात आला. वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोठा धार्मिक विधी करून देवीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अशी माहिती मंदिराचे विश्वस्तांनी दिली.
मुर्हादेवी संस्थानकडून विविध उपक्रम
या संस्थानकडून नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येते. वर्षातून दोनवेळा यात्रा भरवण्यात येते. मंदिर परिसरात असलेल्या संत झिंग्राजी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो. हनुमान जयंतीला गाढपगाड साजरा केला जातो. संस्थानकडून गावतच माऊली आश्रम निर्माण केला. संस्थान तर्फे दरवर्षी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात येते, कोरोना काळात संस्थानकडून गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थान कडून कोरोना मदत निधी शासनाला देण्यात आला असल्याची माहिती संस्थेंचे सचिव गोवर्धन बोंद्रे यांनी सांगितले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.