सोलापूर : दोन वर्षानंतर नवरात्रीत जग-जोगत्यांची डंका पूजा उत्साहात साजरी (Video) | पुढारी

सोलापूर : दोन वर्षानंतर नवरात्रीत जग-जोगत्यांची डंका पूजा उत्साहात साजरी (Video)

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षानंतर नवरात्रोत्सवात जग-जोगत्यांची डंका पूजा (१८ मेळा) जोडभावी पेठेतील चिराग अली तकीया चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडली. यावेळी सोलापूर शहर-जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील तृतीय पंथी, जग-जोगती मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवातील पहिल्या मंगळवारी ही डंका पूजा करण्याची परंपरा असल्याचे डंका पूजेचे प्रमुख शाम नायक सोलापूरकर यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात येणार्‍या पहिल्या मंगळवारी शहरातील जोडभावी पेठेतील चिराग अली तकीया चौकामध्ये तुळजापूरच्या दिशेने उभे राहून श्री. तुळजाभवानी देवीची पूजा व आरती करण्यात येते. या पूजेसाठी शहर-जिल्ह्यातील व आजूबाजूच्या परिसरातील तृतीयपंथी, देवीचा जग-जोगती यांच्यासह भागातील महिला देवीची परडी-माळ घेवून उपस्थित राहत असतात. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे या पूजेमध्ये खंड पडला होता. परंतु, यंदाच्या वर्षी सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठविल्यामुळे या डंका पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दरवर्षी नवरात्रीमधील पहिल्या मंगळवारी ही डंका पूजा होत असते. या पूजेमध्ये सर्वजण पाच छोटे दगड घेऊन ते एका रांगेत मांडून त्यावर हळद-कुंकू वाहत असतात आणि पान-सुपारी ठेवली जाते. त्यानंतर कापूर लावून आरती करण्यात येते. नारळ वाढवून एकमेकांची गळा भेट घेऊन घरी निघून जातात. सर्वात शेवटी जमलेल्या तृतीयपंथी, जग-जोगत्यांकडून तुळजापूरच्या दिशेने उभे राहून एकत्रित महाआरती करण्यात येते, असे भीमा यल्लप्पा पगड्याल यांनी सांगितले. यावेळी रंजिता नायक, धनू नायक, शमा नदाफ, सुनिता इंगळे, अबोली मंजेली, महंमद रंगरेज, परसू कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button