पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ५ विकेट्स पटकावत हा विक्रम आपल्या नावावर केला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना ३५७ धावा केल्या आणि लंकेसमोर ३५८ धावांचे आव्हान ठेवले होते. दरम्यान, भारताच्या आक्रमक माऱ्यासमोर लंकेने अक्षरश: गुढघे टेकले आहेत. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने आक्रमक मारा करत लंकेचे कंबरडे मोडले आहे. भारताने श्रीलंकेवर तब्बल ३०२ धावांनी मोठा विजय मिळवला. (Mohammed Shami)
मोहम्मद शमीने झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी विश्वचषकात भारतासाठी ४४ बळी घेतले होते. दरम्यान, शमीने ४४ बळींचा टप्पा पार करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ १४ सामने लागले. मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट घेतल्या आणि आता वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावावर ४५ विकेट्स आहेत. झहीर खानने २३ आणि जवागल श्रीनाथने ३४ सामन्यात ४४ विकेट घेतल्या होत्या.
सामन्याच्या 10व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीकडे चेंडू सोपवला. शमीने कर्णधार रोहितला निराश केले नाही आणि लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. शमीने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर चरिथ असलंकाला बळी बनवले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर दुशान हेमंताला तंबूत पाठवण्यात शमीला यश आले. शमीने दुष्मंथा चमीरालाही दुस-याच षटकात बाद केले. तिसऱ्या षटकात त्याने अँजेलो मॅथ्यूजला बोल्ड केले. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 12 धावांचे योगदान दिले.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय राहिला आहे. टीम इंडियाने सर्व सात सामने जिंकले असून, गुणतालिकेत १४ गुण आहेत. ही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. श्रीलंका संघाने या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. तसेच नेदरलँड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. या संघाला दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Mohammed Shami)