ICC ODI WC : शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक

ICC ODI WC : शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI WC : मोहम्मद शमी (18 धावांत 5 विकेट), मोहम्मद सिराज (16 धावांत 3 विकेट) आणि जसप्रीत बुमराह (8 धावांत 1 विकेट) यांच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा अवघ्या 19.4 षटकांत 55 धावांवर ऑलआऊट करून वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली. गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही आणि त्यांना या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

विश्वचषकातील भारताचा 7 सामन्यांतील हा सलग 7 वा विजय आहे. रोहित सेनेने दिमाखात सेमीफायनल गाठली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा 7 सामन्यातील हा 5वा पराभव आहे.

भारताने दिलेल्या 358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाची (0) शिकार केली. यानंतर दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्नेला (0) बाद केले. अशाप्रकारे श्रीलंकेने पहिल्या 2 धावांवर 2 विकेट गमावल्या. त्याच षटकात सिराजने श्रीलंकेला दुसरा मोठा धक्का दिला. त्याने सदिरा समरविक्रमाला (0) स्लिपमध्ये श्रेयस अय्यरकडे झेलबाद केले. श्रीलंकेने आपली ही तिसरी विकेट 2 धावांवर गमावली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने तिसरी विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्याने कर्णधार कुसल मेंडिसला (1) क्लीन बोल्ड केले. श्रीलंकेला अवघ्या 3 धावांवर हा चौथा मोठा धक्का बसला.

जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी श्रीलंकन ​​संघाची स्थिती बिकट होत गेली. चरिथ असलंका 24 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर शमीने दुशान हेमंताला शुन्यावर बाद केले. ज्यानंतर श्रीलंकेची अवस्था 6 बाद 14 अशी झाली. भारतीय गोलंदाजांचा कहर सुरूच होता. शमीने पुन्हा एकदा धक्का दिला. चमीराला त्याने माघारी धाडले. चमीराला एकही धाव काढता आली नाही. अशाप्रकारे श्रीलंकेचे 7 फलंदाज अवघ्या 22 धावांवर बाद झाले. श्रीलंकेचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही श्रीलंकेचा मोठा पराभव टाळता आला नाही. बुमराह, सिराज आणि शमीसमोर श्रीलंकेचे फलंदाज हतबल दिसत होते. भारताकडून शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 5 फलंदाजांना बाद केले. तर सिराजने 3 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पण सलामीवीर शुभमन गिल (92 चेंडूत 92 धावा), विराट कोहली (94 चेंडूत 88 धावा), श्रेयस अय्यर (56 चेंडूत 82 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावा केल्या. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी 189 धावांची मोठी भागीदारी केली. श्रीलंकेसाठी दिलशान मधुसंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दिलशान मधुशंकाने 5 भारतीय खेळाडूंना आपला बळी बनवले. दुष्मंथा चमीराने 1 विकेट आपल्या नावावर केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news