पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli 8000 : श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) सामन्यादरम्यान विराट कोहलीने इतिहास रचला आहे. तो आशियामध्ये खेळताना सर्वात जलद 8000 वनडे धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराटने हा चमत्कार मुंबईतील वानखेडेमध्ये केला. आशिया खंडात 159 डाव खेळून कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सचिन तेंडुलकर (188 डाव), कुमार संगकारा (213 डाव) आणि सनथ जयसूर्या (254 डाव) यांचे विक्रम मोडीत काढले.
आशियामध्ये खेळताना वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर-ब्लास्टरने आशिया खंडात खेळताना आपल्या कारकिर्दीत एकूण 12067 धावा केल्या आहेत. त्यानंतर सनथ जयसूर्या (8,448), संगकारा (8,249) यांचा क्रमांक लागतो.
श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषकातील 33व्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर कोहलीला फलंदाजीसाठी लवकर मैदानात उतरावे लागले. त्याने शुबमन गिलच्या (92) साथीने संघाच्या डावाला आकार दिला. कोहली 88 धावांवर बाद झाला. पण या शानदार खेळीदरम्यान त्याने विविध विक्रमांची नोंद केली. आपल्या खेळीदरम्यान विराटने 18 वी धाव करताच आशियामध्ये 8,000 वनडे धावा पूर्ण केल्या.
उजव्या हाताचा फलंदाज कोहलीने 2008 पासून आशियामध्ये एकूण 165 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 59.19 च्या सरासरीने आणि 96.40 च्या स्ट्राईक रेटने 8,070 धावा केल्या. यात 33 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. 183 ही त्याची आशियातील सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय भूमीवर विराटने 118 एकदिवसीय सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरीने आणि 96.95 च्या स्ट्राइक रेटने 5,866 धावा केल्या आहेत.
कोहलीने 13व्यांदा विश्वचषकात 50+ धावा केल्या आहेत. कोहलीचे या विश्वचषकातील हे 5वे अर्धशतक आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातीक 12 वे अर्धशतक ठरले आहे. कोहली विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करणारा नॉन-ओपनर बनला आहे. त्याच्यापेक्षा सचिन तेंडुलकरने 21 वेळा 50+ धावा केल्या.
कोहलीने 2023 मध्ये एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने एका कॅलेंडर वर्षात 8 व्यांदा 1000+ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक वेळा एका कॅलेंडर वर्षात हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने असा पराक्रम 7 वेळा केला आहे.