जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एमएमआरडीए ( MMRDA ) वसाहतीतील १० वर्ष पूर्ण झालेल्या सोसायट्यांमध्ये पुर्नखरेदी केलेल्या सदनिका खरेदीदारांच्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर तसेच एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांच्यात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत या प्रश्नावर मार्ग निघाला. या सोसायट्यांनी तसे पत्र तात्काळ एमएमआरडीएला द्यावे, पत्र प्राप्त होताच आठवड्याभरातच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी वायकर यांना दिले.
मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्वी प्रती व्यक्ति ९० लिटर पाणी देण्यात येत होते. सध्या पालिका प्रती व्यक्ति १३५ लिटर पाणी पुरवठा करते. अशा वेळी एमएमआरडीएने ( MMRDA ) पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत बदल केल्यास वसाहतीतील पाणी प्रश्नही निकाली काढू शकतो. त्याचबरोबर विधानसभा क्षेत्रातील एमएमआरडी वसाहतीतील पर्जन्य जलवाहीन्या, मलनि:सारण वाहिन्या, एसटीपी प्लांट, आदी प्रश्नही निकाली काढण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. त्यावर प्रत्यक्ष पाहणी करुन पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे बांद्रेकरवाडीतील बाधित होणार्या पहिल्या माळ्यावरील बाधित घरांची तपासणी करुन निर्णय घेण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी अधिकार्यांना केल्या.
मेट्रोच्या कामामुळे रखडलेल्या संजय गांधी नगर, पंप हाऊस या दोन्ही भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी स्वत: बोलू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. पुनमनगर येथील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. मुंबई आय.आय.टी पवई पुर्वापार भांगशेला व पेरुबाग येथील आदिवासी पाड्यांचे रखडलेल्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी विनंती यावेळी वायकर यांनी केली.