मुंबईत क्रूझवर टाकलेल्या पार्टीवरून आता एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सामना रंगला आहे. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे आणि भाजपचा कार्यकर्ता मेहुणा मोहित कांबोज यांची भेट झाल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
या भेटीचे व्हिडिओ आपल्याकडे असून ते लवकरच जाहीर करू, असेही मलिक यांनी सांगितले आहे.
'क्रूझवरील कारवाईत एनसीबीने ११ जणांना ताब्यात घेऊन त्यातील तीन जणांना नंतर सोडून दिले होते. त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक होते, असा आरोप मलिक यांनी केला होता. यावर कंबोज यांनी मलिक यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. असे असताना मलिक यांनी पुन्हा नवा आरोप केला आहे.
मलिक म्हणाले, 'क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोहित कांबोज यांनी नेमके काय काय केले ते मी समोर आणणार आहे. कांबोज आणि समीर वानखेडे यांची ७ ऑक्टोबर रोजी एके ठिकाणी भेट झाली, त्याची मला माहिती आहे. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून मी एकदोन दिवसांत तो प्रसारित करणार आहे.
केवळ क्रूझवरील कारवाई नाही तर रिया चक्रवर्ती हिला झालेली अटक आणि त्यानंतर सातत्याने अनेक सेलिब्रिटींना ज्या प्रकारे ड्रग्ज प्रकरणांत अडकवण्यात आले, त्या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश मी करणार आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. ते म्हणाले, 'बॉलीवूडला, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी एक मोठं षङयंत्र भाजपने रचले आहे. या सर्वामागे भाजप आहे आणि एका अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्या माध्यमातून सर्व कारवाया केल्या जात आहेत, हा माझा दावा आहे. हा दावा खरा आहे, आणि तो सिद्ध करण्यासाठी अनेक व्हिडिओ मी समोर आणणार आहे.
मलिक यांनी केलेला दावा फेटाळत मोहित कांबोज यांनी वानखेडेंना मी भेटलो नाही असे सांगितले. 'समीर वानखेडे हे कसे दिसतात हे सुद्धा मी आजवर पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्न दूरच राहतो. मी वानखेडे यांना भेटल्याचा पुरावा मलिक यांनी द्यावा नाहीतर दुसऱ्या नोटिशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही कंबोज यांनी दिला.
मलिक यांचा जावई ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचे उघड झाल्यानेच मलिक यांचा हा सारा थयथयाट सुरू आहे, असा आरोप कंबोज यांनी केला आहे. 'माझा मेहुणा ऋषभ सचदेव याला सोडण्यात आले असेल तर त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. ज्यांच्याबाबत कोणतेही पुरावे नव्हते त्या सर्वांनाच एनसीबीने सोडले आहे. ड्रग्जशी काहीही संबंध नसल्यानेच यांना सोडले गेले आहे,' असेही ते म्हणाले.