परभणी, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कुळाचे पुराचे जमा करण्याचे काम करत आहे. पण मराठा समाज हा एकच कुटूंब असून एखाद्या मराठा समाजबांधवाकडेही कुणबीबाबतचा ठोस पुरावा आढळला तरी एकच कुटूंब समजून सरकारने सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे, असा इशारा मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange -Patil) यांनी राज्य सरकारला परभणी येथे आज (दि.२) दिला.
शहरातील वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालय मैदानावर आज दुपारी मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange -Patil) यांची जाहीर विराट एल्गार सभा पार पडली. मनोज जरांगे- पाटील यांचे आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मराठा समाज आरक्षण मागणीसाठी दि.19 ऑगस्टला अंतरवालीतून लढा सुरू झाला असून तो आजही मोठया प्रमाणात सुरूच आहे. मराठा समाजातील मुलांचे आरक्षणाअभावी मोठे हाल होत आहेत. आता हा लढा कुण्या एकटयाचा राहिला नसून स्वत:च्या मुलाच्या हक्क न्याय मागणीकरिता सर्वसामान्यांतून तो सुरू झाला. माझी एकमेव मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी आहे. सरकार याबाबत काही वेगळे करता येते का याचा विचार करत असून वंशावळीच्या नोंदी तपासत आहे.
या नोंदी मराठा समाजाकडे असतील, तर तुमच्या कायद्याची समाजाला गरज काय ? असाही सवाल जरांगे- पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्या उपोषण कालावधीत अनेक किस्से घडले असून सरकारने मुदत मागितल्यानंतर त्यांना बोनस म्हणून 10 दिवस अतिरिक्त देण्यात आले आहेत. ही मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार असून याआधीच आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे दि.14 ऑक्टोबरला विराट मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला घरा-घरातून मराठा समाजबांधव अंतरवालीत दाखल झाला पाहिजे, असे आवाहनही केले. तेथील जनसमुदाय पाहुनच सरकारला आरक्षणाच्या जीआरवर सही करण्याची गरज भासली पाहिजे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी भाजपाचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, हभप अच्युत महाराज दस्तापूरकर, शिंदे गट जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, भाजपाचे बाळासाहेब जाधव, सुभाष जावळे पाटील, नितीन देशमुख, गजानन जोगदंड, प्रा.अनंतराव शिंदे यांच्यासह सकल मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान जिल्हातील आहेरवाडी येथील चिमुकली आरोही खंदारे हिने जोरदार भाषण केले. तसेच शाहीर यशवंत जाधव व सुरेश जाधव यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम पार पडला.
मराठा समाज आरक्षण मागणीसाठी कोणत्याही समाजबांधवांनी यापुढे उग्र आंदोलन व वाहनांची जाळपोळ करू नये, आपल्यासाठी आपण आरक्षणाची मागणी करत आहोत, म्हणून कोणत्याही तरूणाने आरक्षणाकरिता जीवन संपवू नये. आंदोलनात शांततेत सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे- पाटील यांनी यावेळी केले.
हेही वाचा