वडीगोद्री (जालना); पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांचा राज्यव्यापी दौरा शनिवारपासून सुरू झाला. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह लगतच्या नगर, नाशिक, सोलापूर, बुलडाणा व यवतमाळ आदी 13 जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत.
अंतरवाली सराटीतून ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन जरांगे-पाटील हे 25 वाहनांच्या ताफ्यासह रवाना झाले. ते 12 दिवसांचा दौरा करणार आहेत. 87 गावांमध्ये जाऊन जरांगे-पाटील मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. यासाठी ते 5 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. जरांगे-पाटील यांच्यासोबत कायम 200 कार्यकर्ते सोबत राहतील.
14 ऑक्टोबरला राज्यव्यापी मेळावा घेऊन ते आंदोलनादरम्यान झालेल्या घडामोडींचा आढावा लोकांसमोर मांडणार आहेत. दौरा करून कोणावरही दबाव आणत नाही आणि सरकारही आमचा दबाव घेत नाही. आरक्षण देण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकारवर दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही. अंतरवाली सराटीतील साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले.