नवी मुंबई; पुढारी वृतसेवा-कोकण हापूसच्या आधीच परदेशी मलावीसह कर्नाटक आणि केरळच्या हापूसने बाजारपेठेत एण्ट्री केली आहे. आज (दि. २६) ८०० बॉक्स मलावी हापूस आंबा एपीएमसीत दाखल झाला. अवघ्या दहा मिनिटात मलावी हापूस आंब्यांच्या बॉक्सची मुंबईतील आठ व्यापाऱ्यांनी खरेदी केली. कर्नाटक, केरळ येथील हापूस आंब्याची दररोज 400 पेटींची आवक सुरू झाली आहे.
'एपीएमसी'त आफ्रिकन देशातील मलावी हापूस आंबा आज (शनिवार) बाजारात दाखल झाला. साडेतीन ते पाच हजार रुपये या प्रमाणे दोन डझनच्या पेटीला दर मिळाला. मलावी हापूस आंबा हा घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी मागवला. दरवर्षी 10 ते 15 डिसेंबरपर्यंत मलावी हापूस आंब्याची आवक होते. दोन ते तीन आठवडे हा बाजार सुरू असतो. आज 800 पेटी मलावी आंब्यांच्या पेट्या मुंबईतील आठ व्यापा-यांनी अवघ्या १० मिनिटांत खरेदी केल्या. यामुळे मलावीला मुंबईत चांगली मागणी असल्याचे समोर आले आहे.
याबरोबरच कर्नाटक आणि केरळ येथील हापूस आंब्याच्या दररोज 300 पेटी आंब्याची आवक सुरू आहे. हा आंबा चारशे ते आठशे रुपये दोन डझनची पेटीला या प्रमाणे दर मिळतो. यामुळे कोकण हापूसच्या आधीच परदेशी मलावी आणि कर्नाटक आणि केरळच्या हापूसने एण्ट्री केली आहे. कोकण हापूसच्या तीन दिवसात चार पेट्या देवगडवरून आल्या. कोकण हापूसला आठ ते नऊ हजार रुपये दर मिळाला आहे.
हेही वाचा :