महाराष्ट्र-कर्नाटक सीमा खटला लढूच, एकही गाव देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा खटला लढूच, एकही गाव देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कराड : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान किंवा तुलना कोणाशीही कोणीही करू शकत नाही आणि ते कोणीही मान्य करणार नाही. कोणाच्याही अशा विचारांशी आम्ही सहमत नाही. यामध्ये माझी व उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आम्ही जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, अशी भूमिका मांडतानाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा आमचा व या राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यातील एकही गाव इकडून तिकडे जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कराड दौर्‍यावर असताना नवीन विश्रामगृहाच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, मंत्री ना. उदय सामंत, आ. महेश शिंदे, आ. शहाजी पाटील, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा आमच्या व राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. 2012 सालातील जत तालुक्यातील काही गावांचा विषय होता. त्या संदर्भात मंत्री ना. शंभूराज देसाई व मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात सांगितले आहे. हे दोन मंत्री तेथे जाऊन तेथील लोकांच्या अडीअडचणी सोडवतील. राज्यातील एकही गाव आपले इकडून तिकडे जाणार नाही. ही जबाबदारी आमची आहे. जे आत्ता बोलत आहेत, ते तेव्हा कुठेच नव्हते. त्यावेळी हा एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आदेशानुसार तेथे गेलो होता. त्यावेळी बेळगावच्या पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या व 40 दिवस जेल भोगलेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे जे आता बोलतायेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि त्यांना बोलण्याचाही अधिकार नाही. सीमालढा आपण सुप्रीम कोर्टात लढत आहोत. त्यासाठी आवश्यक असणारे वकील, कायदेशीर तज्ञ नेमलेले आहेत. न्यायालयीन लढाई तर सुरूच राहील. परंतु तोपर्यंत आम्ही सीमा बांधवांना काय देऊ शकतो, त्याबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे यामध्ये आम्ही पूर्ण लक्ष घातले असून ती संपूर्ण जबाबदारी आमची आहे. राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला, तो आम्ही पुन्हा सुरू केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना सुरू केली. स्वातंत्र्यसैनिकांना 10 हजारचे 20 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी जे वक्तव्य केले त्याबाबत मुख्यमंत्री म्हणून व शिवभक्त म्हणून आपली भूमिका काय राहील असे विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमची भूमिका आम्ही नेहमी उघडपणे घेत असतो. आम्ही लपून-छपून काहीही करत नाही.

Back to top button