बीड; गजानन चौकटे : मकर संक्रात अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. तिळगुळ खा गोड गोड बोला, असं म्हणत यादिवशी तिळगूळ देऊन सणाचा आनंद व्दिगुणित केला जातो. या सणाला तिळाच्या पदार्थांचे खूप महत्त्व आहे. बाजारपेठेत सध्या तीळ आणि तिळापासून तयार होणारे पदार्थांचे दर वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या तिळाचे भाव किरकोळ बाजारात २०० रुपये किलो आहेत. काही महिन्यांपूर्वी १५० ते १६० रुपये प्रति किलोने विकला जाणारा तीळ आता संक्रांती तिळाचे दर वाढत असल्याचे दिसत आहे. (Makar Sankranti)
तीळ दरवाढीच्या मागचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही वर्षांपासून सातत्याने कमी होत चाललेली पेरणी, १० वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही ना काही प्रमाणावर तिळाची पेरणी असायची. मात्र, सध्या ही परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यात उत्पादन कमी असल्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे. (Makar Sankranti)
मागील काही वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा तिळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. उत्पादनात घट आल्याने तिळाचे भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे मकर संक्रातीला तिळाची मोठी मागणी लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचीही चर्चा बाजारपेठेत आहे.
मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरु होते. हा काळ थंडीचा असल्याने तीळ आणि गूळ यांच्या चिक्की, लाडू सेवन केल्यास शरीराला अपेक्षित ऊर्जा तर त्वचेला टवटवीतपणा मिळत असतो. याचमुळे या दिवशी आवर्जून तीळगुळ वाटला जातो. काटेरी हलव्याचे दागिने महिला परिधान करतात. यामुळे घरोघरी तीळ, गूळ खरेदी करून गृहिणी तीळगूळ बनवत असतात. कोरोनाचा विविध उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला तसाच तो कृषी उत्पादनावरही झाला असून किराणा वस्तूंची देखील महागाई पाहायला मिळते.
मकर सक्रातीपूर्वीच तिळाच्या दरात काही अंशी वाढ झाली आहे. ठोक बाजारपेठेत तिळाचे दर वधारलेले असल्यानेच किरकोळ बाजारातही तीळ महागला आहे.
– सुरेंद्र आप्पा रूकर, किराणा व्यावसायिक, गेवराई.मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. सफेद, काळे आणि चॉकलेटी रंगाचे तीळ हे आपल्या जेवणाच्या वापरात असतातच. तिळामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. विविध रोगांपासून दूर राहण्यासाठी तिळाचा वापर करून घेता येतो. इतकंच नाही तर तिळाच्या तेलाने त्वचा आणि केसांनाही फायदा मिळतो. तीळ खाल्ल्याने शरीरामध्ये उर्जा निर्माण होते आणि थंडीपासूनही संरक्षण होते. याच कारणासाठी मकर संक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू केले जातात आणि वाटण्यात येतात. यामध्ये तांबे, मँगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटामिन बी १, बी ६, थायामिन फोलेट, नियासिन, सेलेनियम, झिंक यासारखे पौष्टिक तत्व असतात. तिळाचे आरोग्यदायी फायदे असतात..
डाॅ. राम दातार, गेवराई
हेही वाचा