बारामती : चुकून विधान गेले तर एवढा गवगवा कशासाठी ? विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा माध्यमांना सवाल | पुढारी

बारामती : चुकून विधान गेले तर एवढा गवगवा कशासाठी ? विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा माध्यमांना सवाल

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना माझ्याकडून सावित्रीबाई फुलेंऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला. बोलण्याच्या ओघात ते घडले. परंतु इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी त्याचा नको तेवढा गवगवा केला. मी त्यात असा काय गुन्हा केला? असे काय आकाश पाताळ एक केले ? कि दिवसभर तेच दाखविण्यात आले, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. बारामतीत जनता दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, वास्तविक मी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक व्हायला नको होती. परंतु ओघात ती झाली. त्याचे मोठे भांडवल करण्यात आले. बोलण्याच्या ओघात या गोष्टी घडतात. मला लक्षात आल्यावर मी लागलीच चूक दुरुस्त करत दिलगिरी व्यक्त केली. आपल्या मराठी संस्कृतीत वडीलधा-यांनी आपल्याला जेथे चूक होते तेथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायची शिकवण दिली असल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी सरपंच, सदस्यांची शनिवारी पवार यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यानिमित्ताने शनिवारी बारामती राष्ट्रवादीमय झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी बारामती राष्ट्रवादीमय कधी नव्हती? असा प्रतिप्रश्न केला. गावचे प्रथम नागरिक, सदस्य म्हणून गावाने निवडून दिलेले लोक मला भेटले. काही भगिनींना तर अतिशय तरुण वयात चांगल्या पदावर कामाची संधी मिळाली आहे. त्यांचे मी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. नवीन सरपंच, सदस्यांची एक दिवसीय कार्यशाळा बारामतीत आयोजित करणार आहे. त्यात त्यांची कामे, कामासाठी कोणाकडे पाठपुरावा करावा आदींबाबतचे मार्गदर्शन करणार असल्याचे पवार म्हणाले.

नवीन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. नवीन लोकांच्या हातात गावचा कारभार गेला पाहिजे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे चांगले निकाल लागले. तालुक्यात दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतात. परंतु गटातटात आम्ही पडत नाही. जो गट निवडून येईल त्यांना मदत करायची गावच्या विकासाला हातभार लावायचा ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण मी पुढे घेवून जात असल्याचे ते म्हणाले.
मिरजमध्ये आमदार गोपिचंद पडळकर यांच्या पुतण्याने हाॅटेल पाडले, तेथे शंभर जणांवर गुन्हा दाखल झाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, मला त्याबद्दल माहिती नाही. मी आज पहाटेपासून कामात आहे. मध्यंतरी अधिवेशनामुळे मला थोडे लक्ष देता आले नव्हते. बारामतीत ऑलिम्पिकच्या धर्तीवर कबड्डी सामने सुरु आहेत. तेथे मी वेळ दिला. मी माहिती घेवून यासंबंधी मत व्यक्त करेन.

Back to top button