विदर्भ

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, पूर्व विदर्भात यलो अलर्ट

Shambhuraj Pachindre

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अमरावती आणि नागपूर, गोंदियाला या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आल्यानंतर आता नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण आहे. आज दुपारनंतर तसेच सायंकाळी नागपुरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. विदर्भात तापमान सध्या सर्वाधिक 41-42. अंशाच्या आसपास आहे.

आजपासून हवामान विभागाने चार दिवस नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. आज (दि.२८) रविवारचा दिवस असल्याने बाहेर फिरायला गेलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणामुळे काहीसे पावसाळी वातावरण आणि पावसानंतर प्रचंड उकाडा असे वातावरण अनुभवास येत आहे. सिव्हील लाईन्स, राजभवन, काटोल रोड,कोराडी रोड अशा काही भागात पावसाच्या सरीनी उकाडा वाढविला.

नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आकडेवारीनुसार तापमान कमी असले तरी रोज दुपारी 12 नंतर उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. ढगाळ वातावरण, पावसाच्या हजेरीने विदर्भात मे अखेरीसही तापमान कमी झाल्याचे अनुभवास येत आहे. अधूनमधून पावसाच्या हजेरीमुळे लग्न, स्वागत समारंभात वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडत आहे. पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही वाढले असून उकाड्याने सध्या नागरिक हैराण होत आहेत.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT