Karanja Bothra Ginning Massive Fire Pudhari
वाशिम

Washim Ginning Fire | बोथरा जिनिंगला भीषण आग; हजारो क्विंटल कापूस जळून खाक

ट्रकच्या गरम सायलन्सरचा कापसाशी संपर्क आल्याने दुर्घटना; लाखो रुपयांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Karanja Bothra Ginning Massive Fire

वाशीम : कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील बोथरा जिनिंगमध्ये साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला बुधवारी (दि. ११) दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला असून जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रकच्या गरम सायलन्सरचा कापसाशी संपर्क आल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोथरा जिनिंगच्या मोकळ्या परिसरात सुमारे पाच हजार क्विंटल कापूस साठवून ठेवण्यात आला होता. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आर्णी येथून कापूस घेऊन आलेल्या ट्रकमधील कापूस खाली करण्याचे काम सुरू होते. यावेळी ट्रकच्या गरम सायलन्सरचा कापसाशी संपर्क आल्याने कापसाच्या गंजीने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात एकच धावपळ उडाली.

आगीचा फैलाव रोखण्यासाठी कापसाची गंजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, या प्रयत्नादरम्यान ट्रॅक्टरनेही पेट घेतला. प्रसंगावधान राखत गावातील तरुणांनी तातडीने ट्रॅक्टर बंद करून त्यावरील आग विझवली. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारंजा लाड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, कारंजा येथून घटनास्थळाकडे निघालेल्या अग्निशमन दलाच्या वाहनाचा खराब रस्त्यामुळे आखतवाडा परिसरात रॉड नादुरुस्त झाला. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी वेळेत पोहोचू शकले नाही. परिणामी, आग विझवण्याची जबाबदारी स्थानिक नागरिक आणि जिनिंगमधील कामगारांवर आली.

गावातील युवक आणि कामगारांनी पाण्याच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. जिनिंगचे मालक सुनील बोथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.

गावातील वीजपुरवठाही होता बंद

जिनिंगला आग लागली त्यावेळी गावातील वीजपुरवठा बंद होता. विद्युत ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू असल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे आग लागल्यानंतर तातडीने विद्युत सुविधांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे बचावकार्य आणि आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडचणी निर्माण झाल्या.

दोन हजार क्विंटल कापूस जळाल्याचा मालकाचा दावा

जिनिंगचे मालक सुनील बोथरा यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी जिनिंगला लागलेल्या आगीत जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. ट्रकच्या गरम सायलन्सरचा कापसाशी संपर्क आल्याने आग लागली. गावातील युवक आणि जिनिंगमधील कामगारांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT