Washim News | अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त १२ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटींची लाखाची दिवाळी मदत जमा!

वाशिम जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ५०८ शेतकऱ्यांना ७९ कोटी ७५ लाख रुपये....
Washim News
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on: 
Updated on: 

वाशीम : राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. यानुसार ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत वितरित झाली आहे. त्यापैकी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण १२ लाख ८२ हजार २०३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटी १० लाख रुपयांच्या दिवाळी अग्रीम मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास त्या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी नुकतीच दिली आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दिवाळी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबववून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यावर भर देण्यात आला. या मदतीमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

अमरावती विभागातील १२ लाख ८२ हजार २०३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटी १० लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार १५२ शेतकऱ्यांना ८१ कोटी ८ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यातील ३ लाख ६ हजार ७०९ शेतकऱ्यांना १५३ कोटी ३५ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ८३३ शेतकऱ्यांना २१२ कोटी ९२ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ५०८ शेतकऱ्यांना ७९ कोटी ७५ लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख २८ हजार १ शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करून त्यांना अग्रीम मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.