

वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याचा फटका आता जलसाठ्यांनाही बसू लागला आहे. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, आगामी काळात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८५ लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत अवघा २९.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल ११ प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे 'दुष्काळाची झळा अन् जलाशय तहानलेले' असे विदारक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील ८५ लघु प्रकल्पांची एकूण संकल्पित पाणीसाठा क्षमता १२३.६४ दशलक्ष घनमीटर (दलघमी) इतकी आहे. मात्र, सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ३६.९८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या तुलनेत सुमारे ७० टक्के जलसाठा रिकामा झाला आहे. पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जलसाठ्यांची ही स्थिती चिंताजनक बनली आहे.
तालुकानिहाय पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यास कारंजा तालुक्याची परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. तालुक्यातील ७ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ०.७० दलघमी म्हणजेच ७.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील १३ प्रकल्पांमध्ये ३.७६ दलघमी (२५.१५ टक्के), रिसोड तालुक्यातील १६ प्रकल्पांमध्ये ६.३१ दलघमी (२६.७६ टक्के) पाणीसाठा आहे.
मालेगाव तालुक्यातील १३ प्रकल्पांमध्ये ६.२७ दलघमी (३०.३३ टक्के), मानोरा तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये ९.४७ दलघमी (३५.१२ टक्के), तर वाशिम तालुक्यातील १८ लघु प्रकल्पांमध्ये १०.४७ दलघमी (३७.४० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. तुलनेने वाशिम तालुक्याची स्थिती समाधानकारक असली, तरी जिल्ह्यातील एकूण जलसाठ्याचे चित्र मात्र चिंताजनक आहे.
जिल्ह्यातील ८५ लघु प्रकल्पांच्या वर्गवारीवर नजर टाकल्यास पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होते. तब्बल ११ प्रकल्प पूर्णतः कोरडे आहेत. चार प्रकल्पांमध्ये ० ते १० टक्के, २२ प्रकल्पांमध्ये १० ते २५ टक्के, ३९ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के, तर केवळ आठ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकही लघु प्रकल्प १०० टक्के भरलेला नाही.
जिल्ह्यातील जलाशयांची खालावलेली पाणीपातळी पाहता आगामी उन्हाळ्यापूर्वीच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने आतापासूनच संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून पाणी बचत, उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन आणि टंचाईग्रस्त गावांसाठी पर्यायी उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे शेतकरी अल्प पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे जलाशयही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यापुढे आता शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.