Illegal abortion pills seizure Washim
वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या "बेटी बचाव अभियान" तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, 1994 (PCPNDT Act) यांच्या कठोर अंमलबजावणीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन वाशिम कार्यालय तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने ग्राम अनसिंग (ता. जि. वाशिम) येथे धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान दोन गंभीर स्वरूपाची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
अनसिंग येथे गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्रीप्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे में. आई मेडिकल स्टोअर येथे डमी ग्राहक पाठविण्यात आला. संबंधित ग्राहकाकडून गर्भपातासंदर्भातील औषधांची मागणी करण्यात आली असता औषध विक्रेता किशोर नामदेव डोके यांनी कोणतेही वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्पान न पाहता गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री केली.
ही विक्री करीत असताना रंगेहात आढळून आले. यानंतर औषध निरीक्षक मनीष गौलमारे यांनी औषध आस्थापनेची सविस्तर तपासणी केली. तपासणी वेळी सामान्य रुग्णालय, बुलढाणा यांचे पथक राधा नरवलिया (PCPNDT विधी सल्लागार), कक्षसेवक अश्विनी अवचार, कक्ष सेवक राजेश्वर शेळके, कनिष्ठ लिपिक शुभम आपुतीकर व कनिष्ठ लिपिक आकाश धनगर उपस्थित होते,
तपासणी दरम्यान संबंधित औषध स्थापनामध्ये गर्भपाताच्या संदर्भातील 09 नग MTP KI (GESTAPRO TABLETS) चा साठा आढळून आला. सदर साठ्याच्या खरेदी-विक्री संदर्भातील आवश्यक नोंदी, बिल, स्टॉक रजिस्टर किंवा कायदेशीर कागदपत्रे विक्रेत्याकडून सादर करण्यात आली नाहीत.
ही बाब औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 तसेच PCPNDT Act, 1994 च्या तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन करणारी असून गंभीर दंडनीय गुन्हा आहे. सदर औषधे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून नमुने शासकीय औषध विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
त्यानंतर संशयावरुन एक पथक सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद धिरके यांच्या नेतृत्वाखाली ग्राम खडसिंगी अनसिंग (ता. जि. वाशिम) येथील किशोर नामदेव डोके व ज्ञानेश्वर नामदेव डोके (मेडिकल मालक) यांच्या घरी तपासणीसाठी गेली असता तेथे नामदेव सखाराम डोके हे उपस्थित होते.
तपासणीदरम्यान Vegra-100 mg (Sildenafil Citrate Tablets 100 mg) ही कामोत्तेजक स्वरुपाची ऍलोपॅथिक औषधे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली आढळून आली.
सदर साठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे :
एकूण प्रमाण: 253 स्ट्रिप (प्रत्येक स्ट्रिपमध्ये 4 गोळ्या)
एकूण अंदाजित किंमत: 20,448/-
सदर औषधांचा साठा कोणत्याही वैध औषध विक्री परवान्याशिवाय ठेवण्यात आलेला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 अंतर्गत ही बाब गंभीर व दंडनीय स्वरुपाची आहे. संबंधित साठा पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला असून नमुने विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
वरील दोन्ही प्रकरणे अत्यंत गंभीर स्वरूपाची असून गर्भपाताच्या औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री तसेच बेकायदेशीर कामोतेजक औषध साठा हे सार्वजनिक आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेस बाधक आहे. संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 तसेच PCPNDT Act, 1994 अंतर्गत कठोर दंडात्मक व न्यायालयीन कार्यवाही करण्यात येणार आहे.स्त्री भ्रूण हत्या, लिंग निवड व बेकायदेशीर औषध व्यवहारांविरुद्ध प्रशासन शून्य सहनशीलता धोरण अवलंबत असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, वाशिम यांनी दिला आहे.
उपरोक्त कारवाई जिल्हाधिकारी, वाशिम यांच्या निर्देशानुसार, सह आयुक्त (औषधे), अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय, वाक्रिम यांच्या सहकार्याने तसेच गजानन. प्र. घिरके, सहायक आयुक्त (औषधे), वाशिम यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली आहे.