समाजाचा सांस्कृतीक वारसा,इतिहासाचे जतन, दर्जेदार साहित्याची निर्मिती,जास्तीत जास्त युवा साहित्यीक तयार व्हावे, मौखीक भाषाचे रूपांतर लेखणीत व्हावे, समाजाच्या कला, बोलीभाषा, पेहराव, समाज एकसंघ रहावा या उदात्त हेतूने यंदाचे ५वे अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन नागपूरात होणार असल्याची माहिती गोर बंजारा साहित्य संघ, भारतचे राष्ट्रीय संघटक मनोहर चव्हाण यांनी दिली आहे.
नागपूर हे महाराष्ट्राचे चळवळीचे एकमेव ठिकाण आहे. येथून पेरल्या जाणाऱ्या गोष्टी अख्या भारताच्या कानाकोपऱ्यात पेरल्या जातात. तसेच नागपूर शहर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना आपला प्रवास सुलभ व्हावा, याकरीता नागपूर शहर निवडल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
२०१४ मध्ये साहित्य संघाचे दुसरे संमेलन नागपुरात झाले होते, तिसरे संमेलन वाशीम ला तर चौथे साहित्य संमेलन तेलंगणा राज्याची राजधानी हैद्राबाद येथे पार पडले होते. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून शेषराव चव्हाण,प्रकाश जाधव,होमसिंग पवार,सुमित राठोड, एकनाथ गोफणे, सुग्रीव राठोड भीमराव पवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.
नागपूरातच संघटनेची मोठी फौज तयार असल्याने सदर संमेलन यशस्वी होईल, असा आशावाद संमेलनाचे मुख्य आयोजक मनोहर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. येत्या रविवारी २२ नोव्हेंबर ला संमेलनाचे 'मुख्यसंयोजक' व 'स्वागताध्यक्ष' यांची घोषणा करण्यात येणारअसल्याची माहिती मुख्य आयोजक मनोहर चव्हाण यांनी दिली आहे