Seva Pandharwada 2025 : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ (Pudhari File Photo)
वर्धा

Seva Pandharwada 2025 | सेवा पंधरवड्यातून हजारो नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 2022 मध्ये प्रथम आपण वर्धा जिल्ह्यात राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्याच्या या उपक्रमातून राज्यभर हजारो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर दरम्यान आयोजित सेवा पंधरवड्याचा समारोप पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास भवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार संदीप पुंडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात पांदन रस्त्यांची मोहिम घेण्यात आली. यामुळे जिल्हाभरातील पांदन रस्ते मोकळे होऊन त्यांना नंबर प्राप्त होणार आहे. दुसरा टप्पा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसलेल्या नागरिकांना पट्टे वाटपाचा होता. अनेक नागरिकांना पंधरवड्यात पट्टे उपलब्ध झाल्याने त्यांना हक्काचे घर उपलब्ध होण्याचा मार्ग निर्माण झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात विविध प्रमाणपत्र, दाखले वाटपाची मोहिम राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले.

विविध विभागांच्यावतीने विविध नाविण्यपुर्ण उपक्रम पंधरवड्यात राबविण्यात आले. जिल्ह्यात पांदनरस्ते, पट्ट्यांचा चांगला उपक्रम या दरम्यान झाला आहे. जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवडा अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्याने जिल्ह्यात चांगले काम होऊ शकले. जिल्हा प्रशासनाचे काम कौतुकास्पद ठरले, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी पंधरवडा कालावधीत सर्वच विभागांनी चांगले काम केले. हे काम पुढेही असेच सुरु राहील, असे सांगितले. प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरवडा राबविण्यात आला. पंधरवड्यातील उपक्रमात 26 विभागांनी सहभाग नोंदविला. हजारो नागरिकांना थेट सेवा यामाध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगितले.

यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते लाभ, प्रमाणपत्र, पट्टे, दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सेवा पंधरवड्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी यांनी केले तर आभार तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी मानले. कार्यक्रमास वर्धा उपविभागातील नागरिक, लाभार्थी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पंधरवड्यात नागरिकांना उपलब्ध झालेल्या सेवा

वर्धा उपविभागात सेवा पंधरवडा कालावधीत एकून 32 हजार 416 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. त्यात शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप 9326, पांदनरस्ते सर्वेक्षण करणे, मोकळे करणे 690, सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत पट्टे वाटप 1098, आवास योजना, मालमत्ता फेरफार, मृत्यू प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण 1793, पांदनरस्ते मोजणी, मिळकत पत्रिका अद्ययावत करणे, स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटप, फेरफार अदालत 104, आदिवासी प्रकल्प मंजूरी, वसतिगृहांना सोईसुविधा 113, शेतपिक, पशुधन नुकसान मदत 21, बालसंगोपण योजना लाभ व अनाथ प्रमाणपत्र वितरण 12 लाभार्थ्यांना करण्यात आले.

कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ 1224, लेक लाडकी योजना लाभ 336, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभ 791, कामगारांची नोंदणी, नुतनीकरण, लाभ वाटप 5944, वीज कंपनीच्यावतीने सुर्यघर योजना व इतर लाभ वाटप 3068, राशनकार्ड वितरण, कार्डवरील नाव कमी करणे, वाढविणे 1344, आपले सरकार सेवा केंद्र विविध प्रमाणपत्र 960, वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती 2123, पिककर्ज 6, समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ 694, दिव्यांगांना लाभ 88, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभ 990, विद्यार्थ्यांना प्रवास पास वाटप 1526 तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने 21 तर सहकार विभागाच्यावतीने 38 लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट; राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रम येथील बापू कुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी संपूर्ण आश्रमाची पाहणी केली तसेच आश्रमातील गोशाळेला भेट दिली. गोशाळेत असलेल्या विविध जातीच्या गाईंबद्दल सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच आश्रमातील सोईसुविधांबाबत चर्चा केली.

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट

महात्मा गांधीनी दिलेला शांती व अहिंसेचा संदेश आजच्या तरुण पिढीने मनात रुजविणे आवश्यक असल्याचे मत डॉ.भोयर यांनी यावेळी व्यक्त केले. आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सकाळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेस नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. सकाळपासून अखंड सुतकताईचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा गांधींच्या पुतळ्यास सुतमाला अर्पण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सुतमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे उपस्थित होते. त्यांनी देखील सूतमाला अर्पण करुन अभिवादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT