विदर्भ

Yavatmal Murders : नवरात्रोत्सवात दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले

रणजित गायकवाड

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : Yavatmal Murders : सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना यवतमाळ शहरात पूर्ववैमन्यसातून धारदार शस्त्राने दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी (ता. १२) रात्री दहा वाजता आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर हा थरार घडला. या प्रकरणातील सहा संशयीत आरोपींना पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. या घटनेमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वसीम पठाण दिलावर पठाण (वय ३६, रा. नेताजीनगर) व उमेश तुळशीराम येरमे (३४, रा. नेताजीनगर) अशी मृतांची नावे आहेत तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह छोटू अनवर खा पठाण (५४, रा. नेताजीनगर), नीरज वाघमारे (३३, रा. मधुबन सोसायटी), अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख (२८, रा. नेताजीनगर), नितीन पवार (२४, रा. वडगाव), नीलेश उईके (२२, रा. लोहारा) अशी अटकेतील संशयीत आरोपींची नावे आहे. ( Yavatmal Murders )

मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वसीम पठाण याच्या मोबाइलवर अब्दुल रहेमान याचा फोन आला. फोन स्पीकरवर असल्याने सदर फोन कुणाचा आहे, हे पत्नीला समजले. फोनवर वसीमला बाहेर बसण्यासाठी बोलावले. लगेच मित्र उमेश येरमे व वसीम पठाण हे दोघेही दूचाकीवरून निघून गेले.

रात्री साडेआठ वाजता पत्नीने वसीमला फोन केला. त्यावेळी आम्हाला नीरज वाघमारे याने पार्टी दिली आहे. मित्रांसोबत जेवण करून घरी येतो, असे सांगितले. रात्री दहा वाजता पत्नीने फोन केला, असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान रात्री साडेअकरा वाजता वसीम व उमेशचा खून झाल्याची माहिती पत्नीला मिळाली. छोटू अनवर खा पठाण, नीरज वाघमारे यांच्या सांगण्यावरून पतीचा खून केला, अशी तक्रार पत्नी निखत वसीम पठाण (२७, रा. नेताजीनगर) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिली.

त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर अवघ्या सहा तासात पोलिसांनी दोघांना नेताजीनगर व चार जणांना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर येथून अटक केली. रात्री घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

SCROLL FOR NEXT