लातूर : पाच MIM नगरसेवकांच्या खांद्यावर राष्ट्रवादीचे उपरणे | पुढारी

लातूर : पाच MIM नगरसेवकांच्या खांद्यावर राष्ट्रवादीचे उपरणे

लातूर/ देवणी; पुढारी वृत्तसेवा

लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत पदार्पणालाच तब्बल सात जागांवर विजय खेचत सर्वांचे लक्ष वेधणार्‍या एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. येवू घातलेल्या पालिका निवडणुकीपूर्वीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अवलंबलेली ही रणनिती राष्ट्रवादीला पोषक ठरणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलीक, राज्यमंत्री संजय बनसोडे, महेबुब शेख, प्रदेशसरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, चंदन पाटील नागराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सय्यद ताहेर हुसेन, जरगर समशुद्दीन, शेख नुरजहा बेगम, शेख फय्याज, हाश्मी रेश्मा खतेजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नगरसेवक तथा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा खा. इम्तियाज जलील यांच्याकडे पाठवला होता. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा झडत होती. ती या प्रवेशाने खरी ठरली.

2016च्या नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने सहा जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधले होते. एमआयएमच्या या यशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत यश मिळाले नव्हते. काँग्रेसला 14 तर भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या.

आता येवू घातलेल्या निवडणुकीत अशी निराशा पदरी पडू नये यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एमआयएमच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश हा उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button