विजयी षटकार ठोकणारा केकेआरचा राहुल त्रिपाठी सामन्यानंतर काय म्हणाला? - पुढारी

विजयी षटकार ठोकणारा केकेआरचा राहुल त्रिपाठी सामन्यानंतर काय म्हणाला?

शारजाह : पुढारी ऑनलाईन

कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून देणारा राहुल त्रिपाठी म्हणतो की सामना इतका अटीतटीचा होईल असे वाटले नव्हते. कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा शेवटच्या षटकात ३ विकेट्सनी पराभव केला. आता १५ ऑक्टोबरला अंतिम सामन्यात कोलकाता चेन्नईशी भिडणार आहे.

दिल्ली विरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात केकेआरला विजयासाठी १३६ धावांची गरज होती. सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने दमदार सुरुवात करत ९६ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर कोलकाताने आपली सामन्यावरील पकड गमावली. त्यांनी ७ धावात तब्बल ६ विकेट गमावल्या. अखेर राहुल त्रिपाठी केकेआरचा तारणाहार ठरला. त्याने अश्विनच्या शेवटच्या षटकात २ चेंडूत ६ धावांची गरज असताना विजयी षटकार मारत सामना दिल्लीच्या पारड्यातून कोलकाताच्या खिशात टाकला.

सामना झाल्यानंतर राहुल त्रिपाठी या थरारक सामन्याबद्दल बोलताना म्हणाला की, ‘खूप भारी वाटत आहे. संघासाठी विजय फार महत्वाचा होता. आम्हाला एक ते दोन षटके कठीण गेलीत आणि मला सामना इतका अटीतटीचा होईल असे वाटले नाही. आम्ही सामना जिंकलो याचा आनंद आहे. रबाडाने १८ वे षटक जबरदस्त टाकले. पण, मला माहित होते की मला फक्त एक चेंडू चांगल्या प्रकारे टोलवायचा होता.’

अशी रणनीती आखली : राहुल त्रिपाठी

राहुल त्रिपाठी पुढे म्हणाला, ‘रणनीती अशी होती की संधी मिळाली की २ धावा काढायच्या. जर दोन धावा निघणार असतील तर आम्ही धावणार होतो. नाहीतर तो चेंडू मीच खेळणार होते. नवीन फलंदाजाला आल्या आल्या धाव घेणे किंवा चौकार मारणे कठीण होते. चेंडू खाली राहत होता आणि मोठा फटका मारणे कठीण होते.’

त्रिपाठीने संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांच्या सकारात्मक दृष्टीकोणामुळेच संघाने यश मिळवले आहे असे सांगितले. तो म्हणाला ‘मला माझ्यावर विश्वास होता की फक्त एक चांगला फटका आणि आम्ही विजयी होऊ. आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रानंतर आमच्या संघाचा झालेला प्रवास मस्त आहे. आम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि जो दृष्टीकोण मॉर्गन आणि प्रशिक्षकांनी ठेवला त्याचा फायदा झाला.’

आता केकेआर १५ ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी सीएसके सोबत आपल्या तिसऱ्या आयपीएल विजेतेपदासाठी झुंजणार आहे. तर सीएसके आपल्या चौथ्या विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल.

Back to top button