नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वारांगनांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार्या सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांना आज नागपूर पोलीस आयुक्तालयात रोखण्यात आले. नागपूर शहरातील गंगा जमुना या वारांगनांच्या वस्तीतील महिलांच्या प्रश्नासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देण्यासाठी विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे गेल्या होत्या. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखले.
भाजपच्या नेत्यांनी कालच सीपींना निवेदन दिले होते. येवढेच नव्हे तर सीपींच्या कार्यालयात भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली. त्यामुळे भाजप नेत्यांचे निवेदन स्वीकारणाऱ्या सीपींनी आम्हाला का रोखले, असा संतप्त सवाल धोटे यांनी केला.
नागपुरात पोलीस प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यासाठी अजगरासारखं सुस्त पडलेलं अपयशी महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचा गृहविभाग जबाबदार आहे. काल तर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात भाजपचे नेते निवेदन द्यायला आले आणि त्यांचे निवेदन घ्यायला आयुक्त कॉन्फरन्स हॉलमध्ये आले. तेथेच भाजप नेत्यांची पत्रकार परिषद झाली आणि या परिषदेला आयुक्तसुद्धा सुरुवातीचा काही वेळ उपस्थित होते. नंतर ते त्यांच्या कक्षात गेले. नागपूरच्या इतिहासात हे बहुधा पहिल्यांदा घडले असावे, असेही धोटे म्हणाल्या.
राजकीय नेते जर असेच पत्रकार परिषदा घ्यायला लागले, तर प्रेस क्लब आणि पत्रकार भवनला लवकरच टाळे लावावे लागेल. प्रशासकीय इमारतीमध्ये राजकीय लोक किंवा सामाजिक संघटना पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. काल भाजपच्या नेत्यांनी कायद्याचे सर्रास उल्लंघन केले. यामध्ये जे लोक दोषी आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली.
राजकीय नेत्यांना थेट प्रवेश आणि महिलांचे प्रश्न घेऊन आलेल्या महिलेला पोलीस आयुक्त कार्यालयात येण्यापासून रोखण्यासाठी शेकडो पोलीस तैनात केले जातात. हे कशाचे लक्षण मानावे, असा प्रश्न करीत कालच्या पत्रकार परिषदेला दोषी असलेल्यांवर दोन दिवसांत कारवाई करावी. जर ही कारवाई झाली नाही, तर सोमवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.
हेही वाचा