विदर्भ

सध्या वाघांचे योग्य ठिकाणी स्थानांतरण! मग तो वाघ जंगलातला असो किंवा राजकारणातला

स्वालिया न. शिकलगार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – वाघांचे योग्य ठिकाणी स्थानांतरण करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मग तो वाघ जंगलातला असो किंवा राजकारणातील. आतापर्यंत ४० वाघांचे स्थलांतरण आम्ही योग्य ठिकाणी केले आहे. उर्वरित जखमी वाघांसाठी काही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत. तिथे त्यांचा योग्य उपचार केला जाईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केले.

ताडोबातील काही वाघ नवेगाव नागझीरा प्रकल्पात नेले जात असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याविषयी केलेल्या तक्रारीबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी करावी सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे. अनेकदा अशा प्रकरणाच्या तपासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि उगीचच गैरसमज निर्माण होतात, असे मुनगंटीवार म्हणाले.

नागपुरात आले असता मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी राजा ठाकूर नामक गुंडाला सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला. गृहमंत्री, पोलिस आयुक्त यांचे लक्ष वेधले यासंदर्भात ते म्हणाले, हे प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासलं पाहिजे. या प्रकरणामध्ये सत्यता आहे की नाही, आरोप करण्यामागे तर्क काय आहे, हे न सांगता आरोप केले. तर भविष्यात एखादा खरा आरोपही लोकांना खरा वाटणार नाही किंबहुना कुणावरही उठसूठ आरोप करण्याची 'फॅशन' सुरू होईल.

याविषयी संजय राऊत यांच्याकडे जी माहिती असेल, ती पोलिसांनी प्रसंगी त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतली पाहिजे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तार योग्य वेळी होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याविषयीची स्पष्टता केली आहे. अडीच वर्ष सत्ता नसल्याने आम्ही कोणीही मंत्री नव्हतो. मात्र, राज्याचे प्रश्न घेऊन लढत होतो. लोकांचे प्रश्न सोडवतच होतो असे सांगत वेळ मारून नेली.

SCROLL FOR NEXT