शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, आयोगाच्या निकालावर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य | पुढारी

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, आयोगाच्या निकालावर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य

पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणात अनेक मतभेद असतात, काही वेळा संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतं, याबाबत शंका आहे, असं शरद पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार आज दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठा निकाल दिला. त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज चिंचवडमधील पत्रकार परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलं.

खासदार शरद पवार म्हणाले की, “राजकारणात मतभेद असू शकतात, काही वेळेस संघर्षही होतो. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं यापूर्वी कधीच झालं नाही. मीही काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो, मात्र, तेव्हा मी असं काही केलं नाही. चिन्हांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं. मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण, येथे निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नाही. अशावेळी जनता ही ज्या पक्षावर अन्याय झाला आहे, त्यांच्या बाजूने जाते. सध्या मी राज्याच्या अनेक भागात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे, हे दिसतंय. या सर्व गोष्टींचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील.”

शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय, याबाबत शंका आहे. निवडणूक आयोग हे कोणाच्या तरी सांगण्याने बोलत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागे कोणती तरी महाशक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन दिसत आहे, असं शरद पवार म्हणाले.

Back to top button