नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची जात वैधता प्रमाणपत्राची केस गेल्या २० महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रकरणावर आता वेगवेगळे वक्तव्य यायला सुरुवात झाली आहे. महायुतीत या जागेवरून घमासान सुरू झाले असून एनडीएचे घटक असलेल्या नेत्यांनीच आता नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
राणा यांच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेने दंड थोपटले असून, आता नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते, माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी राणा यांना घरचा आहेर दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेकडून या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले असल्याने भविष्यात राणा-कडू यासोबतच राणा-अडसूळ असे चित्र रंगण्याची चिन्हे आहेत.
१६ आमदारांचा निकाल लागतो. मात्र, गेल्या २० महिन्यांपासून खासदार नवनीत राणा यांच्या प्रकरणाचा निकाल लागत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय कोणाच्या शब्दावर चालतंय? असा सवाल अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राणांविरुद्ध अडसूळ असा सामना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत राणा दाम्पत्याच्या कार्यक्रमात आल्याने भाजप ही जागा लढणार असे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीत दावेदार वाढले आहेत.