

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीकडे पाठ फिरवल्यानंतर आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये युती होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
मान म्हणाले, "आम्ही पंजाबमध्ये काँग्रेस सोबत युती करणार नाही, आमचे काँग्रेसशी काहीही देणंघेणं नाही. पंजाबमधील लोकसभेच्या सर्व १३ जागा आम्ही लढवू आणि त्या जिंकू."
दरम्यान पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचाही याला पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. पंजाबमधील 'आप'ने सर्व १३ जागा लढवण्याचा प्रस्ताव सादर केला होता, तो केजरीवाल यांनी मान्य असल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.