नागपूर: काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आज शनिवारी (दि.४) मोठी घोषणा केली आहे. मुंबईत आज होणाऱ्या ओबीसी संघटनांच्या बैठकीत सरकारने यापूर्वी काढलेला, ओबीसी समाजावर अन्याय करणारा जीआर (शासन निर्णय) रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करू, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीसाठी सकल ओबीसी समाजाचे नेते आणि पदाधिकारी आज (दि.४ ऑक्टो.) मुंबईकडे रवाना झाले, त्यापूर्वी वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाचा 'सत्यानाश' करण्याचे काम मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज्य सरकार करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी समाजावरील याच अन्यायाच्या विरोधात १० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जीआर रद्द केल्यास, हा मोर्चा देखील सर्वांशी चर्चा करून रद्द केला जाईल, असे स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध ओबीसी संघटनांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनाही बोलावले होते. परंतु, डॉ. तायवाडे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. विशेष म्हणजे, सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर ओबीसी समाजाला घातक नाही, अशी भूमिका त्यांनी यापूर्वीच जाहीर करत फडणवीस सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.