

Vijay Wadettiwar criticism on CM over reservation issue
पुणे: राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री व महायुतीचा ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाप्रमाणे खेळ सुरू आहे. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची बनवाबनवी करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पुण्यात केली.
काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी सेलमार्फत पुण्यात रविवारी (दि. 14) काँग्रेस भवनमध्ये ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद, आमदार वडेट्टीवार व सतेज पाटील, सेलचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी माजी आमदार व माजी नगरसेवक उपस्थित होते. (Latest Pune News)
या बैठकीनंतर तब्बल 75 संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार व अनिल जयहिंद यांनी वरील टीका केली. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दबावापोटी शासन निर्णय काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा केली.
वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या आदेशामुळे ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. येत्या 10 ऑक्टोबरला नागपूर आणि 20 ऑक्टोबर रोजी संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चाचे आयोजन केले आहे.
भाजप दुतोंडी गांडूळ
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रोत्साहन देणारा भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ असून, त्याच्या दोन्ही बाजूला तोंड व शेपूट आहे. हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या व जल्लोष करणाऱ्यांचा देशात अगरबत्ती व धूप लावून यथोचित सत्कार केला पाहिजे.
इकडे रुपयाचे मूल्य खाली जात आहे, बांगलादेशमध्ये हिंसाचार होऊनही तिथला रुपया टंकाची किंमत सुधारत आहे. मात्र, भारतातील रुपयाची किंमत खाली येतेय, याकडे भाजपचे दुर्लक्ष आहे, असा निशाणाही वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर साधला.