MPSC Paper Leak
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पेपर लव्ह स्टोरीमध्ये फुटलेला नाही तर यात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केला.
एमपीएससीच्या वर्ग-१ आणि वर्ग-२च्या अनेक जागांवर सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, एमपीएससीला स्वच्छ करण्याची गरज आहे. आयोगाच्या अध्यक्षांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक असतील तरच राज्यातील लाखो तरुणांचा आयोगावरील विश्वास कायम राहील. एमपीएससी अध्यक्षांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.संबंधित अध्यक्ष आरटीओ विभागातून सेवानिवृत्त झालेले असल्याने त्यांच्या प्रशासकीय पार्श्वभूमीचीही तपासणी झाली पाहिजे.
आरोग्य विभागातील वर्ग-१ पासून वर्ग-४ पर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची जबाबदारी एमपीएससीकडे सोपवण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एमपीएससीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. हे सगळे पेपर ऑनलाईन घेण्यापेक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावेत. वर्ग-३ आणि वर्ग-४च्या भरतीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली तरच यातील गडबड थांबू शकते, असे त्यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारावरही वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देणे, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणे आणि पदोन्नतीच्या प्रक्रियेत निर्माण झालेला गोंधळ यामुळे अनेक पदे रिक्त राहिली आहेत. या संपूर्ण प्रकरणात एमपीएससीमधील संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने जीआर रद्द केला असला तरी विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत होतो. आता प्रश्न विचारणारे लोकच सरकारला सहन होत नाहीत. प्रश्न सोडवण्याची हिंमत नाही आणि म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका त्यांनी केली. मागील वर्षी आदिवासी विभागाच्या तरतुदीपैकी केवळ सुमारे २९ टक्के निधी खर्च झाला.आदिवासींसाठी मंजूर केलेला निधी दुसरीकडे वळवण्याचा अधिकार सरकारला आहे का? असा सवाल केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले झिरवळ खाऊन-पिऊन आंदोलन करा, असे विद्यार्थ्यांना म्हणत असतील कारण ते देखील खाऊन-पिऊनच सर्व करतात, असा टोला लगावला.
आरटीओ विभागातील गैरप्रकाराबाबत वडेट्टीवार म्हणाले की, त्यांनी यापूर्वी उपस्थित केलेला मुद्दा अद्याप कायम आहे. संबंधित अधिकाऱ्याला पुन्हा महत्त्वाची जबाबदारी मिळत असल्यास त्यामागे वरिष्ठांचे संरक्षण आहे का, याची चौकशी झाली पाहिजे.
खोटे ट्रॅप करून एसीबीच्या कारवाईचा गैरवापर झाला असल्याच्या तक्रारी आहेत. पुन्हा बैठका आणि कारभार सुरू झाल्याची माहिती आहे. आमचे त्यावर लक्ष आहे. गैरप्रकार पुन्हा सुरू झाला तर आम्ही तो सोडणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.