MPSC Paper Leak : औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला अवर सचिवासह ६ गजाआड

तीन अधिकाऱ्यांचा समावेश; भरती प्रक्रिया रद्द; शुल्काविना फेरपरीक्षा
Paper Leak
Paper Leakfile photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्‍न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न परीक्षेपूर्वीच मिळवून अनधिकृत व्यक्तींना वितरित केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह सहाजणांना अटक केली आहे. एमपीएससीने संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असून आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीचे सहायक विभाग अधिकारी विश्वेश्वर दत्तात्रय नकाते, अवर सचिव अभिजित गणपतराव लेंढवे आणि सहायक विभाग अधिकारी गोपाळ भट्टू मराठे यांचा समावेश आहे. याशिवाय, नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचा संचालक प्रवीण दिलीप पाटील, कथित मध्यस्थ अमृत नामदेव पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

औषध निरीक्षक परीक्षेसाठी तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या प्रश्नसंचातील २९४ प्रश्नांचा संच विश्वेश्वर नकाते याने परीक्षेचे समन्वय अधिकारी म्हणून काम करताना मिळवला. हा संच एमपीएससीच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये अवर सचिव अभिजित लेंढवे याच्याकडेे देण्यात आल्याचा आरोप आहे. लेंढवे याने तो संच कक्ष अधिकारी गोपाळ मराठे याच्याकडेे दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. २० मार्च रोजी गोपाळ मराठे याने हा संच नंदुरबार येथील क्लासचालक प्रवीण पाटील याच्याकडे दिल्याचा आरोप आहे. या व्यवहारात पाच लाखांची देवाणघेवाण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संपूर्ण व्यवहार सुमारे १२ लाख रुपयांचा असल्याचा संशय आहे.

२० मार्च रोजीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा आणि ते समाजमाध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारींमध्ये होता. आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला परीक्षेपूर्वी प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्‍न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news