Legislative Council Elections
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. Pudhari News Network
नागपूर

Vidhan Parishad Election Result|शिंदे सेनेचे विदर्भात कमबॅक; भाजपच्या गणितापुढे 'मविआ' नेते नापास

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र उट्टलवार

नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जबरदस्त विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पूर्व विदर्भात भंडारा- नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय डॉ. परिणय फुके (भाजप), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत आणि लोकसभा निवडणुकीत खासदारकीची संधी सोडणारे कृपाल तुमाने (शिवसेना) यांच्या निमित्ताने 2 आमदार मिळाले आहेत.

Summary

  • विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमदेवार रिंगणात

  • महायुतीचे 9 उमेदवार तर मविआचे दोन उमेदवार विजयी

  • शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का

यवतमाळला भावना गवळी यांच्या निमित्ताने आणखी एक आमदार मिळाला. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमदेवार रिंगणात होते. महायुतीचे 9 उमेदवार तर मविआचे दोन उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीच्या किंबहुना शरद पवार समर्थीत शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. एकंदरीत या निवडणुकीचा संपूर्ण 'निकाल' आता पुढे आला असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

भाजपच्या गणितापुढे महाविकास आघाडीचे बडे नेते नापास

भाजपचे पाच उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, डॉ परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत सहज विजयी झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या अफलातून आत्मविश्वास आणि संख्याबळाच्या गणितापुढे महाविकास आघाडीचे बडे नेते नापास झाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शतप्रतिशत विजय मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीत अपयश या निवडणुकीत धुवून निघाले. बंडाच्या वेळी खासदारांना एकत्रित करणारे आणि ऐनवेळी रामटेकला तिकीट नाकारण्यात आलेले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर शरसंधान करणारे कृपाल तुमाने यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला.

पुरसे संख्याबळ नसताना 2 उमेदवार निवडून आणण्यात अजित पवारांना यश

आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी औटघटकेचे का होईना मंत्रीपदही पदरी पडते का हे पाहणे महत्वाचे आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनीही पहिल्याच फेरीत विजय मिळवला. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांकडे आवश्यक मते नसताना देखील आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यात अजित पवारांना यश आले. शिवसेना (शिंदे गट) यांनी देखील विजय मिळवला आहे. कृपाल तुमाने यांना 25 आणि भावना गवळी यांना 24 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मते होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होता. उद्धव ठाकरेंकडे केवळ 16 मते होती. पण काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला.

SCROLL FOR NEXT