..तर विधानसभेच्या सर्व जागा लढविणार : मनोज जरांगे पाटलांचा निर्धार 

Maratha reservation-Manoj Jarange patil
Maratha reservation-Manoj Jarange patil

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. सग्या-सोयर्‍यांचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याची अंमलबजावणी व मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कायदा पारीत होण्यासाठी येत्या 4 जूनपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे सग्या-सोयर्‍यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी. शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील 288 जागा सर्व जाती- धर्मांच्या नागरिकांना उमेदवारी देऊन लढविणार आहे, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला.

कोथरूड पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात वॉरंट बजाविल्यानंतर मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. 31) सकाळी शिवाजीनगरमधील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाले होते. या वेळी ते प्रसार माध्यमांशी बोलले. जरांगे म्हणाले, मी जातीयवाद करत नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा, इतकेच म्हणालो होतो. त्याचा अर्थ जातीयवाद केला, असा होत नाही. तो जनतेचा अधिकार असून, त्यातून जनतेची ताकद दिसली पाहिजे. ओबीसी बांधवांच्या भावना दुखावतील असे कोणतेही वक्तव्य माझ्याकडून झाले नाही. आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्यांनाच मी नेहमी बोलतो. कारण, नेते हे कोणाचेच नसतात.

नेत्यांचे ऐकून दुही निर्माण होऊ देता कामा नये, अशी काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. बीडमधील दोन गटांमधील तणाव निवळला असून, आपण यापूर्वी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जातीयवाद आपल्याला मान्य नसून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. मात्र, विरोधकांना हे मान्य नसून त्यांच्याकडून याबाबत कोणतेही आवाहन होताना दिसत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news