नागपूर

पीएम विश्वकर्मा योजनेमुळे कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होईल : देवेंद्र फडणवीस

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेमुळे पारंपारिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युवक-युवतींमध्ये कौशल्य विकासाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी 'पीएम स्कील रन' ही दौड आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या : 

दिक्षाभूमी परिसरातील अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून पीएम स्किल रनला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने कौशल्य प्रशिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कौशल्यावर आधारित पीएम विश्वकर्मा या एका नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होईल. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. भविष्यात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असेही फडणवीस म्हणाले.

आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

विकास बिसने, भारत शाहू आणि तेजस बनकर यांनी पुरुष गटात तर महिला गटात मोना सोमकुवर, निकीता शाहू आणि तृप्ती बावणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे आयुक्त डॅा. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT