Nagpur Tragic Accident: नागपूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला आहे. कामठी मार्गावर ई-बाईक अनियंत्रित होऊन तरूणी दुभाजकावर आदळली. त्यानंतर ती शेजारून जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या खाली आली अन् तरूणीचा जागीत मृत्यू झाला आहे. मृत तरूणीचे नाव अंजली पांडे असून सायोना पब्लिक स्कूलसमोर शुक्रवारी ही घटना घडली.
विशेष म्हणजे इथं रस्त्याचं बांधकाम सुरू असल्याने एकाच मार्गावरून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू होती. याच मार्गावर दुचाकीचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असून कपिलनगर पोलिसांनी मनपा बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.
मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील महामार्गांवर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकींचे नियंत्रण सुटून चालक रस्त्यावर पडत आहेत. मागून येणाऱ्या अवजड वाहनांखाली चिरडून मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी नोंदवल्या जातात.
ठाण्यातील एका एनडीआरएफ जवानाचा मृत्यू झाला होता. तो जवान दोन जुळ्या मुलांचा बाप होता. असाच एक बाप आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडवरून खाली पडला. यात मुलाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता.