

Mayor on NMC Meeting Vande Mataram
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् गीताचे अर्धवट गायन झाल्याने महापौर निता ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकृत आणि महत्त्वाच्या सभेत राष्ट्रभावनेशी निगडित गीताचे गायन पूर्ण न होणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत महापौरांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना पत्र पाठविले आहे. या प्रकाराची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
२० ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन भवन येथे मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी वंदे मातरम् गीत गायनाची परंपरा आहे. मात्र, यावेळी गीत पूर्ण होण्यापूर्वीच गायन थांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची महापौरांनी गंभीर दखल घेतली.
अधिकृत सभेत वंदे मातरम् गीताचे अर्धवट गायन होणे योग्य नसल्याचे महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. गायन अर्धवट का थांबविण्यात आले, यामागील नेमके कारण काय, याची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या घटनेची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याचेही निर्देश महापौरांनी दिले आहेत. तसेच मनपाच्या सर्वसाधारण सभांसह अन्य अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् गायनासाठी निश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महापौरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनपा प्रशासनात चर्चेला उधाण आले असून, चौकशीनंतर संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे